DCM Devendra Fadnavis Replied Uddhav Thackeray: धारावीकरांचे पुनर्वसन व्हायला पाहिजे. मात्र, आम्ही संपूर्ण मुंबई अदानी-अंबानींच्या घशात घालू देणार नाही. तिथे टीडीआरची सक्ती करायला नको. तरीदेखील टीडीआर बँक बनवायची असेल तर त्याची मालकी सरकारकडे असायला हवी. अदानीकडे नाही. आमच्या काळात टेंडर निघालेले नाही हे जगजाहीर आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. हिवाळी अधिवेशन सुरू असून, नागपूर येथे मीडियाशी उद्धव ठाकरे बोलत होते. या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी एकच गोष्ट सांगतो की, जे पहिले धारावीचे टेंडर होते, ते काही अदानी यांना देण्यात आलेले नव्हते. ते टेंडर रद्द करण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केले. आता जे टेंडर आहे, त्याचे नियम आणि अटी ठरवण्याचे काम कोणी केले, तेही उद्धव ठाकरे सरकारने केले. हेच उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे की, ते विकासाच्या कामांना नेहमीच विरोध करतात, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.
उद्धव ठाकरेंचा मूळ स्वभाव विकासाला विरोध करणे हाच आहे
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धारावीतील लोकांना घरे मिळू नये, अशीच यांची नीती आहे. धारावीतील लोकांना घरे मिळाली, तर ते आमच्या पाठिशी येणार नाहीत, यांना झुंझवत ठेवा, अशा प्रकारची नीती त्यांची दिसते. त्यानुसारच त्यांचे काम चालले आहे, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. तसेच पहिल्यांदा जी रिफायनरी होती, त्याला विरोध केला. मग उद्धव ठाकरेंनीच त्यांचे सरकार असताना पत्र पाठवले की, या ठिकाणी नको तर त्या ठिकाणी रिफायनरी करा. मग तिथे रिफायनरी करायला घेतली तर स्वतःच तिथे विरोध करायला गेले. त्यामुळे त्यांचा मूळ स्वभाव विकासाला विरोध करायचा आहे. विकासाला विरोध आहे, त्या व्यक्तीशी काय बोलायचे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील कामकाजात सहभागी झाले. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे नागपूरला अधिवेशनाला आले. आता ते किती दिवस आले, याचा हिशोब तुम्ही करा. पण ते आले, ते काय कमी आहे का, प्रत्यक्ष येऊन बसले हे कमी आहे का, त्यावर फार बोलणार नाही, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.