लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाखोंच्या गाैण खनिजाची चोरी आणि तस्करी करणाऱ्या ट्रकचालक-मालकांना डीसीपी विनीता साहू यांच्या विशेष तपास पथकाने आज दुपारी चांगलाच दणका दिला. रेती, गिट्टी आणि मुरूम भरलेल्या तीन ट्रकसह ७० लाखांचा मुद्देमाल या पथकाने सोमवारी दुपारी जप्त केला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहराच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. केवळ सार्वजनिक वाहतूक आणि अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांनाच जाण्या-येण्याची मुभा आहे. अशात डीसीपी साहू यांचे विशेष पथक सोमवारी दुपारी मानकापूर परिसरात गस्त करीत असताना त्यांना या भागातून चोरीच्या रेती-गिट्टीची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी मानकापूर मार्गाकडे धाव घेतली. दुपारी ४ च्या सुमारास एमएच ३१ - एपी १८१६, एमएच ३१ - सीक्यू १०९७ आणि एमएच ३१ - डीएस २७२० हे तीन ट्रक अनुक्रमे रेती, गिट्टी आणि मुरमाने भरून येताना दिसले. पोलिसांनी ते थांबवून रॉयल्टीची विचारणा केली. चालकांनी रायॅल्टी नसल्याचे सांगितले. अर्थात हे लाखोंचे गाैण खनिज चोरून आणल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी आरोपी ट्रकमालक संतोष गायकवाड (रा. गणपतीनगर, मानकापूर), प्रकाश अतकर (गिट्टीखदान) आणि श्रीकांत दिलीप पाटील तसेच ताब्यात घेतलेले ट्रकचालक सुरेश पिराजी आझादे (पिटासूर), सुरेंद्र श्रावण खेतरे आणि दुर्गाप्रसाद कुंमरे (रा. मकरधोकडा) या सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यांच्या ताब्यातून रेती, गिट्टी आणि मुरूम तसेच तीन ट्रक असा एकूण ७० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
----
ट्रकमालक फरार, पोलिसांकडून शोधाशोध
रेती, गिट्टीची तस्करी करताना आपले ट्रक आणि चालक पोलिसांच्या हाती लागल्याचे कळताच आरोपी ट्रकमालक फरार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. डीसीपी विनीता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहायक निरीक्षक दिलीप चंदन तसेच पोलीस कर्मचारी रामदास नेरकर, गणेश जोगेकर, पराग फेगडे, आलिम खान आणि विजय नाईक यांनी ही कामगिरी बजावली.
----