उमरेड : अमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करीची पाळेमुळे आता गावखेड्यापर्यंत पोहोचली आहेत. तरुणाईला खिळखिळी करणाऱ्या या गोरखधंद्यामुळे अनेकांची कुटुंंबसुद्धा उद्ध्वस्त झालीत. अशावेळी तरुणांनीच व्यसनमुक्त समाजासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उमरेड येथील अनिकेत व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्यावतीने आयोजित व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमात करण्यात आले. उमरेड येथील बसस्थानक तसेच सरांडी येथे या कार्यक्रमाचे आयोजन केल्या गेले.
उमरेड बसस्थानक येथे झालेल्या कार्यक्रमात बाबाराव महल्ले, सुरेंद्र तरार यांची उपस्थिती होती. सुनील तांबेकर, विलास चौधरी यांनी मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी नाट्यकलावंत अजय सनेसर याने व्यसनाधीनतेमुळे कशाप्रकारे आयुष्य उद्ध्वस्त होते, यावर चिंतन करावयास लावणारा विनोदी एकपात्री प्रयोग सादर केला. सरांडी येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवी मलवंडे होते. यावेळी सरपंच अनिल भोयर, विश्वनाथ चौधरी, लक्ष्मण चौधरी, शामराव नवघरे, महादेव राऊत आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन देवीदास चट्टे यांनी केले. धनश्री निखार यांनी आभार मानले. संस्थेच्या अध्यक्ष माधुरी भिवगडे, डॉ. मेघा वासे, योगिता चाचरकर, सुमित आडे, मंगेश निखार, अविनाश मस्की, जयंत बावणे आदींनी सहकार्य केले.