वाडीतील हॉस्पिटलमधील प्रकार : बिलाची अवाजवी आकारणीवाडी : बिलाची रक्कम मिळेपर्यंत डॉक्टरांनी मृतदेह अडवून ठेवल्याचा प्रकार वाडी येथील एका खासगी हॉस्पटलमध्ये नुकताच उघडकीस आला. विशेष म्हणजे, रुग्णाचा बुधवारी (दि. ७) मृत्यू झाला असून, डॉक्टरांनी हा मृतदेह शुक्रवारी (दि. ९) नातेवाईकांना हस्तांतरित केला. या हॉस्पिटलच्या प्रशासनाने अवाजवी बिलाची आकारणी केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला.संतकुमार धुर्वे (३५, रा. मारई, ता. उमरेठ, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना त्यांच्या जावयाने वाडी येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. त्यांना खासगी हॉस्पटलमध्ये भरती केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना नव्हती. भरती करतेवेळी ३० हजार रुपये हॉस्पिटलमध्ये जमा करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. संतकुमारचा उपचारादरम्यान बुधवारी (दि. ७) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला, असा गंभीर आरोप मृताची पत्नी रामकली हिने केला आहे. मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाकडे मृतदेहाची मागणी केली. त्यावेळी १ लाख ४२ हजार रुपयांचे बील भरा नंतर मृतदेह घेऊन जा, अशी भूमिका हॉस्पिटल व्यवस्थापनाने घेतली. संतकुमारला हॉस्पिटलमध्ये भरती करतेवेळी २ लाख ५० हजार रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले होते. एवढा खर्च करण्याची ऐपत नसताना उपचार सुरू का केले, असा प्रतिप्रश्नही हॉस्पिटलच्या संचालकाने मृताच्या नातेवाईकांना केला. हॉस्पिटलने १ लाख ४२ हजार रुपये उपचारखर्च व ७० हजार रुपये औषध खर्च मागितल्याची माहिती मृताच्या नातेवाईकांनी दिली. सदर रक्कम मिळाल्याशिवाय मृतदेह मिळणार नसल्याचे बजावण्यात आल्याने नातेवाईकांसमोर पेच निर्माण झाला. मृतदेह मिळविण्यासाठी रामकली व काही स्थानिक नागरिकांनी हॉस्पिटल प्रशासनाकडे विनवणी केली. नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये आणखी ७५ हजार रुपयांचा भरणा केल्यानंतर शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास संतकुमारचा मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आला. धुर्वे कुटुंबिय गरीब असल्याने त्यांच्याकडे एवढी मोठी रक्कम नव्हती. त्यातच वाडी व परिसरात कुणीही ओळखीचे नसल्याने त्यांची मोठी गोची झाली होती. नातेवाईकांनी पूर्वी हॉस्पिटलमध्ये ३० हजार रुपये जमा केले होते. त्याची पावतीदेखील देण्यात आली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला. संतकुमारला छिंदवाड्याहून रुग्णवाहिकेने वाडी येथे आणले होते. त्यामुळे छिंदवाड्यातील काही डॉक्टरांचे या हॉस्पिटलशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात नातेवाईकांनी वाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाडी पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. (प्रतिनिधी)
बिलासाठी अडविला मृतदेह
By admin | Published: September 10, 2016 2:43 AM