नागपूर : अंबाझरी तलावातील माशांचा मृत्यू अचानक वाढला आहे. माेठ्या संख्येने माशांचा खच तलावातील पाण्यावर तरंगताना दिसताे आहे. त्यामुळे आश्चर्य आणि चिंताही व्यक्त केली जात आहे. मात्र या माशांचा अचानक मृत्यू का हाेत आहे, याबाबत महापालिका किंवा कुठल्याही जबाबदार यंत्रणेचे लक्ष गेलेले दिसत नाही.
बुधवारी अचानक मृत माशांचा खच तलावाच्या पाण्यावर ठिकठिकणी तरंगताना आढळून आला. अचानक मासे का मरताहेत, हा प्रश्न निर्माण हाेत आहे. ग्रीन व्हिजिलचे संस्थापक काैस्तुभ चटर्जी यांनी तलावात घडणाऱ्या घडामाेडींवर प्रकाश टाकला व मासे मरण्याच्या काही शक्यता नाेंदविल्या.
- नागपुरातील बहुतेक तलावांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण घटलेले आहे. शहरातील तलावात कृत्रितपणे ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी फवारे किंवा कुठलीच यंत्रणा नाही. ऑक्सिजन कमी झाल्याने मासे व इतर जलचर प्राण्यांना अडचण येते.
- थंड पाण्यात डिसाॅल्वड ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असते. मात्र उन्हाळ्यात तापमान वाढल्याने पाण्याचेही तापमान वाढते आणि उष्ण पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण घटते. माशांच्या मृत्यूचे हेही एक कारण असण्याची शक्यता चटर्जी यांनी व्यक्त केली.
- दिवसा सूर्यप्रकाशाच्या मदतीने तलावातील वनस्पती ऑक्सिजन तयार करतात. त्याचा फायदा माशांना हाेताे. मात्र रात्री फाेटाेसिन्थेसिसची प्रक्रिया बंद हाेते व ऑक्सिजन निर्मितीही थांबते. दुसरीकडे जलकुंभीसारख्या परावलंबी वनस्पती माेठ्या प्रमाणात ऑक्सिजन ग्रहण करीत असल्याने माशांना ते पुरेसा प्रमाणात मिळत नाही.
- उन्हाळ्यातील उष्णतेमुळे तलावाच्या पाण्याचा वरचा स्तर गरम हाेताे. त्याखालचा कमी थंड तर आणखी खालचा थर अधिक थंड असताे. तळातील ऑक्सिजन घटल्याने मासे त्यासाठी वरच्या थरापर्यंत येतात आणि उष्ण पाणी सहन न झाल्याने त्यांचा मृत्यू हाेण्याची शक्यता असते.
- मासेमारी हेही एक कारण असू शकते. मासेमार अधिक मासे मिळावे म्हणून तलावात मासे व खाद्य टाकतात. यामुळे माशांची संख्या क्षमतेपेक्षा वाढते. त्यामुळे खाद्यपदार्थ व ऑक्सिजनसाठी माशांमध्ये संघर्ष वाढताे व त्यात कमजाेर माशांचा मृत्यू हाेताे. मासे मृत्यूचे हेही एक कारण असू शकते.
- तलावामध्ये कुठूनतरी प्रदूषित पाणी प्रवाहित हाेण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. एमआयडीसीकडून हे प्रदूषित व विषारी पाणी येण्याची शक्यता आहे. प्रदूषित पाण्यामुळे मासे मृत्यू हाेण्याचीही शक्यता असू शकते.
अंबाझरी तलावात मासे का मरताहेत यावर सर्वेक्षण हाेण्याची गरज आहे. माशांचे पाेस्टमार्टम केल्यानंतरच उष्णतेमुळे, ऑक्सिजन कमतरतेमुळे की प्रदूषणामुळे मासे मरताहेत, याबाबत खुलासा हाेऊ शकेल. मात्र सध्यातरी ही गंभीर घटना म्हणावी लागेल.
- काैस्तुभ चटर्जी, ग्रीन व्हिजिल