आरोपीची कबुली : महारकुंड शिवारातील वाघिण शिकारप्रकरण खापा : मृत वाघिणीला ट्रॅक्टरला बांधून २०० मीटरपर्यंत फरफटत नेले तसेच मृत सांबरांची विल्हेवाट लावल्याची कबुली वाघिण शिकार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी वनकोठडीदरम्यान वन अधिकाऱ्यांना दिली. सावनेर तालुक्यातील खापा वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या टेंभूरडोह बीटमधील महारकुंड परिसरात वाघिण व दोन सांबरांची शिकार करण्यात आली होती. त्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी ही कबुली दिली. देवीदास रामाजी बोरीकर (४०, रा. महारकुंड, ता. सावनेर) व विनायक नारायण सव्वालाखे (४६, रा. टेंभूरडोह, ता. सावनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनाही १२ जानेवारी रोजी पाच वर्षीय वाघिण आणि दोन सांबराची विद्युत प्रवाहाने शिकार केली होती. त्यामुळे त्यांना वन विभागाच्या विशेष पथकाने मंगळवारी (दि. ७) अटक केली होती. त्यानंतर दोघांनाही सावनेर येथील न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना वन कोठडी सुनावली होती. वन कोठडीदरम्यान आरोपी देवीदासने सांगितले की, वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने त्याने विनायकच्या मदतीने परिसरातून गेलेल्या ११ केव्ही क्षमतेच्या विजेच्या तारांवर हूक टाकला आणि शेताला असलेल्या तारांच्या कुंपणात हा वीजप्रवाह प्रवाहित केला. मध्यरात्री वीजपुरवठा खंडित (ट्रिप) झाल्याने देवीदास शेतात पोहोचला. त्यावेळी त्यांना एक वाघिण व दोन सांबर मृतावस्थेत पडल्याचे आढळून आले. हे दृश्य पाहून तो घाबरला. त्याने लगेच विनायकला शेतात बोलावले. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने दोघांनी वाघिणीला दोराच्या मदतीने ट्रॅक्टरला बांधले आणि मृतदेह २०० मीटरपर्यंत फरफटत नेत जंगलात फेकला. त्यानंतर एका सांबराचे शीर कापले तर दुसऱ्या मृत सांबराला महारकुंड रोडच्या कडेला फेकले, अशी माहिती आरोपींनी दिल्याचे वन अधिकारी शंकर तागडे यांनी सांगितले. आरोपीनी दिलेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी (दि. ९) पुन्हा घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. तिथून हायटेन्शन वायर, टॉर्च, हूक, कपडे व ट्रॅक्टर जप्त करण्यात आल्याचे तागडे यांनी सांगितले. या दोन्ही आरोपींच्या वन कोठडीचा काळ संपल्याने सावनेर येथील न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे दोघांचीही नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. (प्रतिनिधी)
मृत वाघिणीला फरफटत नेले
By admin | Published: February 11, 2017 2:29 AM