लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एमबीबीएस पास होऊन इन्टर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना परमनंट नोंदणी प्रमाणपत्रासाठी मुंबई गाठावी लागायची. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सुरू असलेले ‘लॉकडाऊन’ लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’ने (एमएमसी) विहीत नमुन्यात आरोग्य विज्ञान विद्यापीठ व संबंधित कॉलेजकडून आवश्यक माहिती मागवून त्यांना नोंदणी प्रमाणपत्र देणार आहे. तर एप्रिल व मे महिन्यात संपत असलेली डॉक्टरांची पाच वर्षांची नोंदणी नुतनीकरणाची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढविण्याचा निर्णयही ‘एमएमसी’ने घेतला आहे.‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’चे उपाध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी यांंनी सांगितले, एमबीबीएस पास होऊन एक वर्षाची इन्टर्नशिप पूर्ण केलेल्यांना ‘एमएमसी’कडून कायम (परमनंट) नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करावे लागते. या प्रमाणपत्राचे आधारे पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश दिला जातो. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो आणि नंतर मूळ दस्तावेज घेऊन मुंबई येथील ‘एमएमसी’ कार्यालय गाठावे लागते. परंतु ‘लॉकडाऊन’मुळे विद्यार्थ्यांना मुंबई गाठणे शक्य होत नव्हते. याची दखल घेऊन ‘एमएमएसी’ ने विशेष सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. एक विहीत नमुना तयार केला असून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, सर्व मेडिकल कॉलेज, मेडिकल डीम्ड विद्यापीठला पाठविण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्याला एमबीबीएस पास झाल्याची व इन्टर्नशीप पूर्ण केल्याची माहिती भरून पाठवावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना परमनंट नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल.डॉ. रुघवानी म्हणाले, सर्व डॉक्टरांना दर पाच वर्षांनी ‘एमएमसी’कडे नोंदणी नुतनीकरण करावे लागते. ज्यांना पाच वर्षे झाले आणि एप्रिल आणि मे २०२० मध्ये मुदत संपत आहे. परंतु ‘लॉकडाऊन’मुळे नुतनीकरण करणे कठीण झाले आहे. त्यांच्यासाठी ‘एमएमसी’ने तीन महिन्याची मुदतवाढ दिली आहे. आता नोंदणी ३० जून २०२० पर्यंत सुरू राहणार असल्याचेही डॉ. रुघवानी यांनी सांगितले.