वर्षा बाशूनागपूर: 2004 चा जुलै महिना. संध्याकाळची वेळ. त्याने तिला मारझोड करत घराबाहेर काढलं. एवढंच नाही तर विहिरीतही ढकलून दिलं. विहीरीतल्या पाईपला पकडून ती अंधारात तब्बल दीड तास लटकून होती, कुणीतरी मदतीला येईल या आशेने...तिचा पायही फ्रॅक्चर झाला होता..आणि,नुकत्याच संपलेल्या २०१७ चा डिसेंबर महिना. संध्याकाळचीच वेळ. अमेरिकेच्या मराठी फाऊंडेशनने पन्नास हजारांचा सर्वोच्च सन्मानाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर केल्याची बातमी जाहीर होते.असं काय केलं तिनं या दहा वर्षांत? आणि काय काय नाही घडलं तिच्यासोबत या दहा वर्षांत?केवळ १० वर्षात घडवलेल्या या चमत्काराचं नाव आहे नागपूरच्या रुबिना पटेल.दारुड्या बापाचा मार, हालअपेष्टा, अपमान, अर्धवट शिक्षण आणि १८ व्या वर्षी झालेले लग्न. पुढे पाच वर्षात दोन मुलांची जबाबदारी आणि पुन्हा नवऱ्याचा मार, अपमान, लैंगिक अत्याचार, तिला ठार मारण्याचेही अनेक प्रयत्नं आणि बरंच काही..जगातील करोडो स्त्रियांच्या दु:खी कहाण्यांप्रमाणेच तिचीही एक कहाणी.पण या कहाणीचा उत्तरार्ध मात्र विलक्षण. असामान्य असा. करोडों में एक म्हणावी अशी कहाणी सांगणारा.पुढचे सहा महिने पायाचे दुखणे घेऊन ती अंथरुणाला खिळलेली. भविष्याचा अंधार डोळ््यात भरलेला आणि नवऱ्याने तिच्यावर आत्महत्येची टाकलेली केस कशी लढवायची याचा विचार करत.सर्वसामान्य स्त्री करते तसेच तिनेही केले. पोलीस आणि कोर्टाच्या खेटा घालू लागली. त्यात महिनेंमहिने वाया गेले. काहीच हाती लागेना तेव्हा तिच्या लक्षात आलं, यात अख्खं आयुष्य जाईल पण आपल्याला न्याय मिळणार नाही.मग तिनं आपलं लक्ष केंद्रीत केलं आपल्या मुलीवर. रुबिनाचीआईही तिच्यासोबत राहू लागली होती. रुबिनाने एका शाळेत शिक्षिकेची नोकरी सुरू केली. सोबत बी.ए.चे शिक्षणही. ते झाल्यावर एम.एस.डब्ल्यूही केलं.इथंवरचं तिचं आयुष्य पुन्हा एखाद्या संघर्षग्रस्त स्त्रीचंच होतं. ती नियमाने नमाज अदा करत होती. दर्ग्यात जात होती. पण तिच्या आयुष्यात चांगलं काहीच घडत नव्हतं.अशाच विचारांच्या कुठल्याशा एका क्षणाला तिच्या डोक्यात हातोडा मारल्यासारखे झाले आणि तिला उमगले ते जगण्याचे सत्य.तिच्या शब्दात सांगायचं झालं तर,बस्स. आता यापुढे नाही. आता मी फक्त माझाच विचार करेन. मागच्या सगळ््या बंधनातून मी मोकळी झाले होते. मी स्वतंत्र होते आणि मला माझ्या स्वप्नांचा विचार करायचा होता. त्यांना पूर्ण करायचे होते.दरम्यान आत्महत्येच्या केसमधून तिची निर्दोष मुक्तता झाली होती.२००4 साली एम.एस.डब्ल्यू करता करता तिच्या वस्तीतल्या तिच्यासारख्याच अनेक स्त्रियांना ती नकळत सल्ले देऊ लागली. त्याचा त्यांना फायदाही होऊ लागला. त्याच सुमारास एका भाड्याच्या खोलीत तिने रुबी सोशल वेल्फेअर सोसायटीची स्थापना केली.तिचे काम जसजसे वाढत गेले तिने अन्यही उपक्रमांना सुरूवात केली. स्त्री सबलीकरणाच्या अनेक परिषदांना रुबीनाने हजेरी लावली. याच सुमारास रुबीना यांची ओळख मुंबईच्या हसीना खान यांच्याशी झाली. स्त्रियांसाठी अनेक उपक्रम चालविणाऱ्या कार्यकर्त्या हसीना खान या मुंबईत आवाज ए निस्वान नावाची संस्था चालवतात.२०११ साली रुबिना यांनी स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी आपल्या संस्थेचे ट्रेनिंग सेंटर सुरू केले. शिक्षण कमी असलेल्या, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या आणि नवऱ्याने तलाक दिलेल्या स्त्रियांना येथे ट्रेनिंग देण्याचे काम त्यांनी सुरु केले.आज या ट्रेनिंग सेंटरमध्ये ब्युटीकल्चर ते संगणकापर्यंतचे प्रशिक्षण दिले जाते. रुबिना यांचे काम पाहिल्यानंतर नागपूरच्या प्रसिद्ध हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टने त्यांना नाममात्र दराने आपली एक वास्तू ट्रेनिंगसेंटरसाठी देऊ केली.रुबिना या अलीकडे भंडारा जिल्ह्यात मानवी तस्करी यासंदर्भातही काम करत आहेत.रुबिना यांच्याकडे येणाऱ्या स्त्रियांमध्ये तलाक मिळालेल्या स्त्रियांचे प्रमाण अधिक असते. तलाकबाबत रुबिना म्हणतात, किती क्षुल्लक गोष्टींसाठी तलाक दिला जातो.. इकडे जाऊ नको, त्या पुरुषासोबत बोलू नको, बुरखा न घालता बाहेर पडू नको. बुरखा हा केवळ कपड्याचा नसतो तो धर्माचाही असतो हे या समाजातील पुरुषांना व समाजाला केव्हा कळणार?रुबिना यांना यापूर्वी केशव गोरे स्मारक ट्रस्ट पुरस्कार, हमीद दलवाई पुरस्कार आणि राम आपटे प्रबोधन पुरस्कारानेही गौरवान्वित केले गेले आहे.
प्राणघातक हल्ल्यापासून ते जीवनगौरव पुरस्कारादरम्यानच्या जिद्दीचे नाव : रुबिना पटेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 3:14 PM
अलीकडेच अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाऊंडेशनने नागपूरच्या रुबिना पटेल यांना सर्वोच्च जीवनगौरव हा पुरस्कार जाहीर केला. दि. १३ जानेवारी रोजी पुण्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जात आहे.
ठळक मुद्देरुबिनाच्या मते, स्त्रीपुरुषांना समान वागणूक घरातूनच दिली जाणे गरजेचे आहे. फक्त स्त्रियांनाच समानतेचे धडे देणे पुरेसे नाही. खरंतर ते पुरुषांनाच अधिक व आधी द्यायला हवेत. यासाठी आम्ही जेंडर इक्वालिटीची शिबिरे घेतो. यात तरुण व तरुणी मोठ्या प्रमाणावर सहभागी हो