देशभरात रोहित वासवानीचे जाळे : आणखी एक गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बोगस कंपनी बनवून देशभरातील व्यापाऱ्यांना १० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा चुना लावणाऱ्या रोहित वासवानीचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. त्याने जयताळा येथील अविनाश चव्हाण यांच्या दस्तऐवजाचा वापर करून फसवणूक केली आहे. ३८ वर्षीय रोहित वैशालीनगर येथील रहिवासी आहे. तो दहा वर्षांपूर्वी एका इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत अधिकारी होता. ही कंपनी बंद झाल्यानंतर त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. काही दिवसानंतर तो फसवणुकीचा धंदा चालवू लागला. ताजे प्रकरण २०१४ चे आहे. रोहितने अविनाश चव्हाण यांच्यासोबत एक कंपनी सुरू केली होती. सहा महिन्यांपर्यंत सोबत राहिल्यावर अविनाशला त्याचे खरे रूप लक्षात आले. तेव्हा त्याने स्वत:ला वेगळे केले. यानंतर रोहितने अविनाशचा पासपोर्ट, पॅनकार्ड आणि फोटोचा वापर करून स्वत:ला अविनाशच्या पीसीएल कंज्युमर्स इलेक्ट्रिक एलएलपी कंपनीचा संचालक असल्याचे सांगितले. व्यापाऱ्यांची कोट्यवधीची फसवणूक त्याने अविनाशची बनावट स्वाक्षरी करून वाडीतील एका खासगी बँकेत कंपनीच्या नावाने खाते उघडले. या माध्यमातून तो लोकांची फसवणूक करू लागला. पीडितांच्या तक्रारीनंतर अविनाशला खरा प्रकार लक्षात आला. त्याने वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोहित अनेक दिवसांपासून फसवणुकीचा व्यवसाय चालवीत आहे. तो नवनवीन इलेक्ट्रॉनिक्स कंपनी उघडून व्यापाऱ्यांना जाळ्यात ओढतो. तो मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आपल्या कंपनीत सहभागी करून घेतो. आपली कंपनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तयार करीत असल्याचे सांगून व्यापाऱ्यांना जाळ्यात ओढतो. त्यांना कंपनी वितरक किंवा कॅरी फॉरवर्ड एजेंट बनविण्याचे आश्वासन देतो. या मोबदल्यात तो व्यापाऱ्यांना चांगले कमीशन व मोठ्या प्रमाणात नफा असल्याचे आमिष दाखवितो. व्यापाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तो बाजारात दबदबा ठेवणाऱ्या ब्राँडेड इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना नियुक्त करतो. दुप्पट व तिप्पट वेतनावर अधिकारी नियुक्त करतो. अशा अधिकाऱ्यांशी रोजचा संबंध असल्याने व्यापाऱ्यांनासुद्धा रोहितच्या कंपनीवर विश्वास बसतो. वितरक किंवा कॅरी फॉरवर्ड एजेंट बनविण्याच्या बहाण्याने रोहित व्यापाऱ्यांपासून रुपये घेतो. एकाद्या व्यापाऱ्याला काही दिवसांपर्यंत वस्तूंचा पुरवठा नियमित केल्यानंतर कंपनी बंद करून तो फरार होतो. या प्रकारच्या योजनेनुसार त्याने महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, तेलंगणा, केरळ आदी राज्यातील व्यापाऱ्यांना फसवले आहे. अहमदाबादचे व्यापारी निशांत पटेल यांना याचप्रकारे २२ लाखाने फसविले. अहमदाबाद पोलिसांनी रोहितविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. सप्टेंबर २०१६ मध्ये अहमदाबाद पोलिसांनी रोहितला मुंबईत अटक केली होती. यानंतर त्याला राजस्थान व केरळच्या पोलिसांनी सुद्धा अटक केली. तेव्हापासून रोहित जयपूरच्या तुरुंगात आहे. त्याला राजस्थान उच्च न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे. नागपुरातून मदत रोहितच्या फसवणुकीचा हा व्यवसाय देशातील अनेक राज्यात पसरला आहे. परंतु त्याला खरी मदत नागपुरातून मिळते. तो आपल्या बोगस कंपनीचा पत्ता नागपूर किंवा मुंबईचाच देतो. फसवणुकीचा प्रकार समोर आल्यापासून त्याचे कुटुंबीय रोहितशी आपला कुठलाही संपर्क नसल्याचे सांगत बाजू झटकून देतात. परंतु पकडले गेल्यानंतर त्याच्या मदतीसाठी मात्र तेच धावून जातात. रोहितने या फसवणुकीच्या रकमेतून अनेक बेहिशेबी संपत्ती खरेदी केल्याचेही सांगितले जाते.
व्यापाऱ्यांची कोट्यवधींनी फसवणूक
By admin | Published: May 18, 2017 2:33 AM