ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - भरधाव येणारी कार विजेच्या खांबाला आदळल्यानं भीषण अपघात घडला. या अपघातात कारमधील तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेट्रो रेल्वे कार्यालयाजवळ गुरुवारी मध्यरात्री हा भीषण अपघात घडला. अक्षय मल्हारी मस्के (वय २०), अभिजीत उर्फ जोजो कच्चू पायलू ( वय १८) आणि प्रणव महेश नायडू (वय १९) अशी मृतांची नावे आहेत.
नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री ११.४० वाजण्याच्या सुमारास हे तिघं अंबाझरी, सिव्हील लाईन भागात कारने (एमएच २०/ बीझेड ४७४७) फिरत होते. कार अक्षय मस्के चालवत होता. सिव्हील लाईन्सकडे जात असताना कार चालवताना त्यांच्यात मज्जामस्ती सुरू होती.
कारचा वेग गरजेपेक्षाही जास्त होता. मेट्रो रेल्वे कार्यालयाजवळचा भाग चढ-उताराचा असून तेथे धोकादायक पद्धतीचे वळणही आहे. कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे अपघातस्थळी कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबाला धडकून समोरच्या झाडावर आदळली.
या अपघातात कारचाच चेंदामेंदा झाला. वाटसरुंनीअपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. कार अगदी वाईट पद्धतीनं आदळल्यानं अक्षय, अभिजीत व प्रणव तिघेही कारमध्ये अडकले व गंभीर स्वरुपात ते जखमी झाले होते.
नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना बाहेर काढले. तिघांचीही प्रकृती चिंताजनक होती. त्यांना रुणालयात नेले असता डॉक्टरांनी अभिजीत आणि प्रणवला मृत घोषित केले. तर उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी डॉक्टरांनी अक्षय मस्केही मृत घोषित केले.
निष्काळजीपणा भोवला
तिघांचे बळी घेणा-या या अपघाताला कारचालकाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे पुढे आले आहे. कारचा वेग ताशी १०० किलोमीटरपेक्षाही जास्त असावा. कारण अपघात झाल्यानंतर वेगाचे संकेत देणा-या कारमधील मीटरचा काटा १०० वर अडकून पडला होता. त्यामुळे सदर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.