राकेश घानोडे
नागपूर : कंबरेच्या चामडी पट्ट्याने जबर मारहाण केल्यामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणात आरोपी सुरक्षारक्षकाला शुक्रवारी तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, १५ हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. सत्र न्यायालयाच्या न्या. एच. सी. शेंडे यांनी हा निर्णय दिला.
रणधीरसिंग रामबहादूरसिंग (३६), असे आरोपीचे नाव असून तो साईबाबानगर, शिवणगाव येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी तो मिहान येथे सुरक्षारक्षक होता. विक्रम श्यामराव पाटील, असे मृताचे नाव होते. तो रंगरंगोटीची कामे करायचा व एकटाच राहायचा. रणधीरसिंग सीआरपीएफ भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देत होता.
दरम्यान, तो उमेदवारांच्या वस्तू चोरायचा. २८ जुलै २०१६ रोजी काही उमेदवारांनी विक्रमला याची माहिती दिली. त्यामुळे विक्रमने त्यांना खोली सोडून चांगल्या ठिकाणी राहायला जाण्याचा सल्ला दिला. त्यावरून रणधीरसिंग खवळला. त्याने कंबरेच्या चामडी पट्ट्याने विक्रमला अमानुष मारहाण केली. परिणामी, विक्रमचा मृत्यू झाला. ही घटना सीआरपीएफ कॅम्प गेट-१ पुढे घडली. सोनेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा एफआयआर नोंदवून सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता आरोपीला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याकरिता दोषी ठरवून ही शिक्षा सुनावली. सहायक पोलिस निरीक्षक एन. डी. पगार यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. लिलाधर घाडगे यांनी कामकाज पाहिले.