नागपूर : व्हेंटिलेटरअभावी ‘अंबू बॅग’वर असलेल्या १७ वर्षीय युवतीचा मृत्यू प्रकरणासंदर्भात मेडिकलची स्वत:ची चौकशी पूर्ण झाली असताना वैद्यकीय शिक्षण विभागाने नागपूर बाहेरील तीन सदस्यांकडून चौकशी सुरू केली आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण विभाग या प्रकरणाला घेऊन गंभीर असल्याचे दिसून येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी वैष्णवी राजू बागेश्वर (१७) हिला व्हेंटिलेटरची गरज असताना २४ तास उलटूनही व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ शकले नाही. ‘अंबू बॅग’वरच तिने शेवटचा श्वास घेतला. ‘लोकमत’ने १७ सप्टेंबरच्या अंकात ‘व्हेंटिलेटर मिळालेच नाही, १७ वर्षीय युवतीचा मृत्यू’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. यामुळे दुसऱ्याच दिवशी अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी चौकशीचे आदेश दिले.
रविवारी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी मेडिकलला भेट दिली. दरम्यान, नेमलेल्या पाच सदस्यांच्या समितीने तीन दिवसांच्या चौकशीनंतर बुधवारी अहवाल सादर केला. अहवालात कोणावर ठपका ठेवण्यात आलेला नाही. डॉ. म्हैसेकर यांच्याकडे हा अहवाल सुपूर्द करण्यात आला; परंतु नेमकी स्थिती पडताळून पाहण्यासाठी डॉ. म्हैसेकर यांनी नागपूरबाहेरील मेडिकल कॉलेजमधील तीन वरिष्ठ डॉक्टरांची चौकशी समिती नेमली. गुरुवारी या समितीने चौकशीला सुरुवात केली.
- रुग्णसेवेच्या गैरसोयींवर संचालकांनी ठेवले बोट
संचालक डॉ. म्हैसेकर यांनी सर्व मेडिकलच्या अधिष्ठात्यांची ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे बैठक घेऊन रुग्णसेवेच्या गैरसोयींवर बोट ठेवल्याची माहिती आहे. त्यांनी रुग्णालयात उपलब्ध व्हेंटिलेटर व रोजच्या गंभीर रुग्णसंख्येचा आढवा घेतला. रुग्णांना ‘अंबू बॅग’वर ठेवू नका, नाईलाजाने तशी वेळ आल्यास कमीत कमी वेळ ठेवून तातडीने व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली.
वैद्यकीय शिक्षण विभागाकडूनही नागपूरबाहेरील मेडिकल कॉलेजच्या तीन सदस्यांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत ते अहवाल सादर करतील. वस्तुस्थिती समोर आल्यावरच यावर बोलता येईल; परंतु सर्व मेडिकल अधिष्ठात्यांना गंभीर रुग्णांना तातडीने व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्या, अशा सूचना दिल्या आहेत.
- डॉ. दिलीप म्हैसेकर, संचालक वैद्यकीय शिक्षण विभाग