कामठी - शिवजयंतीची सुटी असल्याने कामठीच्या महादेव घाट येथे कन्हान नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे कामठीच्या हरदासनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अजेश नितनवरे (१३) आणि प्रवेश प्रवीण नागदेवे (१४) रा. हरदासनगर, कामठी अशी मृत मुलांची नावे आहेत. बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कामठीच्या हरदासनगर येथील ७ ते ८ मुले महादेव घाट येथे पोहण्यासाठी गेले होते. यातील चार मुले पोहताना नदीच्या खोल पाण्यात गेली. यातील दोघे बुडताना दिसताना अन्य दोघांनी बाहेर येत त्यांना वाचविण्यासाठी आरडाओरड केली. जलमित्र पुरुषोत्तम कावळे त्यांच्या सहकाºयांसह याच परिसरात होते. त्यांना दोन मुले बुडाल्याची माहिती मिळताच त्यांनी नदीपात्रात अजेश आणि प्रवेशचा शोध घेतला. दीड तासाच्या शोधमोहिमेनंतर या दोघांचे मृतदेह त्यांनी नदीपात्रातून बाहेर काढले. दोन दिवसापूर्वी अजेश नितनवरे याचा वाढदिवस होता. तो सेंट जेलेनी स्कूलमध्ये ७ व्या वर्गात शिक्षण घेत होता. प्रवेश नागदेवे नूतन सरस्वती हायस्कूलचा ९ व्या वर्गाचा विद्यार्थी होता.अजेशच्या वडिलांचे त्याच्या बालपणीच निधन झाले होते. त्याचे वडील डब्ल्यूसीएलमध्ये होते. वडिलांच्या जागेवर त्याच्या आईला डब्ल्यूसीएल प्लांट येथे नोकरी मिळाली होती. अजेश हरदासनगर येथील त्यांच्या आजोबाकडे शिकायला होता. दुसरा मृत प्रवेश याला दोन बहिणी आहेत. प्रवेशच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या आईला मोठा धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळतात हरदास नगर येथील नागरिकांनी महादेव घाटाकडे धाव घेतली. या दोघांचेही मृतदेह कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.
मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलांचा नदीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 10:11 PM