- मौदेकर दाम्पत्याने एकाच वेळी सोडला श्वास, एकाच ओट्यावर झाले अंत्यसंस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विवाहवेदीवर पुरोहितांकरवी नवदाम्पत्याला सप्तपदी करविली जाते. या सप्तपदी म्हणजे आयुष्य जोडीने जगताना एकमेकांप्रति विश्वास, प्रेम, कृतज्ञता व्यक्त करणारे संस्कार असतात. त्यात अखेरच्या श्वासापर्यंत साथ सोडणार नाही, ही अतिशय महत्त्वाची प्रतिज्ञा असते. या प्रतिज्ञेचा प्रत्यय जुना सक्करदरा येथील सोळंकी वाडी येथील वृद्ध मौदेकर दाम्पत्याच्या रूपाने आला. कोरोना संक्रमणाच्या या वावटळीत या दाम्पत्याने एकाच वेळी श्वास सोडला आणि एकाच ओट्यावर अंत्यसंस्कार पार पडले.
नारायणराव आत्मारामजी मौदेकर (७५) हे कोरोना संक्रमणामुळे एम्समध्ये ॲडमिट होते आणि गेल्या आठ दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटर लागले होते. इकडे त्यांची अर्धांगिनी शकुंतला नारायणराव मौदेकर (७२) यांनाही संक्रमण झाल्याने, त्यांच्यावर घरीच डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू होते. दरम्यान, २७ एप्रिल रोजी नारायणराव यांची प्राणज्योत संध्याकाळी ७ वाजता मालवली. बाबा गेल्याचा धक्का आई सहन करू शकणार नाही. म्हणून तिला हे वृत्त सांगायचे नाही, असा प्रण करत प्रशांत, शैलेश व नीलेश या भावंडांनी कोरोना प्रोटोकॉलनुसार बाबांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती. त्याचवेळी गीता, प्रांजू व शीतल या सुना आईच्या सेवेत होत्या. बाबा येतील, ते लवकर बरे होतील, असा धीर त्या देत होत्या. औषधोपचार, सेवा सुरू असतानाच २८ एप्रिलच्या पहाटे ५ वाजता शकुंतला यांनीही आपला अखेरचा श्वास घेतला. एकाच वेळी दोन्ही खंबीर असे छत्र हरविल्याचा धक्का कुटुंबवत्सल मुलांना बसला आणि शेजारी जी हळहळ व्यक्त करायची ती केली गेली. अखेर कोविड प्रोटोकॉलचे सर्व नियम पाळत त्याच दिवशी दोघांवरही गंगाबाई घाट येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच ओट्यावर शेजारी-शेजारी त्यांचा अंतिम प्रवास सुरू झाला आणि विवाहवेदीवरील सप्तपदीची ती प्रतिज्ञा स्मरण करती झाली.
........................