लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : गाेठ्याला लागलेली आग वेळीच नियंत्रणात न आल्याने आत बांधलेल्या गाय व वासराचा हाेरपळून मृत्यू झाला. शिवाय, आतील साेयाबीन, कापूस व शेतीपयाेेगी साहित्य जळाल्याने अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काटाेल-काेंढाळी मार्गावरील रिधाेरा येथे शनिवारी (दि. २६) मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली. रिधाेरा येथील आगीची आठवडाभरातील ही दुसरी घटना हाेय.
यादवराव उमाळे, रा. रिधाेरा, ता. काटाेल यांचा गावातील राममंदिर परिसरात गाेठा आहे. गाेठ्यात नेहमीप्रमाणे गाय व वासरू बांधले हाेते. शिवाय, त्यांनी शेतीपयाेगी साहित्यासह साेयाबीन व कापूसही साठवून ठेवला हाेता. गाेठ्याच्या शेजारी राहणाऱ्या मनाेज यांना मध्यरात्री गाईच्या हंबरण्याचा आवाज ऐकायला आला. त्यामुळे त्यांनी घरातून डाेकावून बघितले असता, गाेठ्याला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच परिसरातील नागरिकांना आवाज देत जागे केले.
नागरिकांनी मिळेल त्या साधनाने पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना फारसे यश आले नाही. शिवाय, बाहेर पडणे शक्य न झाल्याने गाय व वासराचा आत हाेरपळून मृत्यू झाला. शिवाय, साेयाबीन, कापूस, गुरांचा चारा व शेतीपयाेगी साहित्याची राख झाली. आगीचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही. रविववारी (दि. २७) सकाळी तलाठी मारोतकर, पाेलीस व पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी यांनी पाेलीस पाटील सुषमा मुसळे व नागरिकांच्या उपस्थित पंचनामा केला.