हिंगणा : जाेरात कडाडलेली वीज थेट गाेठ्यावर काेसळली आणि त्यात गाेठ्या बांधलेल्या दाेन दुधाळ गाईंचा हाेरपळून मृत्यू झाला. ही घटना हिंगणा तालुक्यातील डेगमा (खुर्द) येथे साेमवारी (दि. १७) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
गौरव धनराज निघोट, रा. डेगमा (खुर्द), ता. हिंगणा हा खासगी कंपनीत रोजंदारीवर काम करायचा. लाॅकडाऊनमुळे काम गेल्याने त्याने कर्ज काढून संकरित गाई खरेदी केल्या आणि दुग्धव्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्याने गाेठाही तयार केला. साेमवारी दुपारी त्याच्या सात गाई गाेठ्यात बांधल्या हाेत्या. सायंकाळी विजांच्या कडकडाटासह वादळ व रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, जाेरात कडाडलेली वीज थेट गाेठ्यावर काेसळली. त्यात आतील दाेन गाई हाेरपळल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
यात आपले किमान एक लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती गाैरव निघाेट याने दिली. माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. ऋचा लांजेवार यांनी घटनास्थळाला भेट देत मृत गुरांची उत्तरीय तपासणी केली. या नैसर्गिक आपत्तीमध्ये गाैरवने माेठे आर्थिक नुकसान झाल्याने शासनाने त्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.