लाेकमत न्यूज नेटवर्क
खात : दुरुस्तीअभावी माैदा तालुक्यातील धर्मापुरी-मोरगाव-महालगाव राेडवर खड्डे तयार झाले असून, त्यात पावसाचे पाणी साचल्याने त्याला डबक्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खड्डे व त्यातील पाण्यामुळे या राेडवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या राेडवर मरण स्वस्त असल्याच्या प्रतिक्रिया या भागातील वाहनचालकांनी व्यक्त केल्या आहेत.
या राेडवरील डांबरीकरण पूर्वीच उखडले असून, सततच्या रहदारीमुळे त्यावर तयार झालेल्या खड्ड्यांचा आकार व खाेली वाढत चालली आहे. राेडवर असलेला डांबराचा थर कुठे गेला, हेही कळायला मार्ग नाही. पाऊस काेसळताच खड्डे पाण्याने तुडुंब भरले आहेत. या राेडवरून पायी चालणे कठीण झाले असताना नागरिकांना वाहने चालवावी लागत आहेत. नागरिकांना त्याच खड्डे व त्यातील पाण्यातून जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात तसेच वाहन खड्ड्यातून गेल्यास अपघात हाेत असून, त्यातून अनेकांना दुखापतही झाली आहे.
खड्ड्यांमुळे या मार्गावारील बससेवा बंद करण्यात आली आहे. रेतीच्या सततच्या ओव्हरलाेड वाहतुकीमुळे या मार्गाची दैनावस्था झाली आहे, असा आराेप नागरिकांनी केला आहे. रेतीची वाहतूक कायमची बंद करून या राेडची दर्जेदार दुरुस्ती करण्याची मागणी मोरगावचे सरपंच नंदू पाटील, तांडाच्या सरपंच मनोरमा डोरले, चंद्रशेखर पाटेकर, श्यामलाल मोहतुरे, धनंजय झिंगरे, धनपाल शेंडे, श्रीकांत झिंगरे, शंकर डोरले, मोहिमुद्दिन तुरक, वर्षा गभणे, मनोहर मेश्राम, राधेश्याम चापले, दुर्योधन बुधे, मूर्ती कारेमोरे यांनी केली आहे.
...
नेत्यांच्या वल्गना अन् नागरिकांचे हाल
हा मार्ग आठ किमीचा आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी या राेडच्या दुरुस्तीला मंजुरी देण्यात व त्यासाठी निधी मंजूर करण्यात आल्याची बतावणी करीत राजकीय नेत्यांनी गाजावाजा करीत भूमिपूजन केले. त्याअनुषंगाने दुरुस्ती कामाला सुरुवात करताच चार दिवसांनी काम बंद करण्यात आले. तेव्हापासून आजवर या राेडच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. खड्ड्यांमुळे या भागातील नागरिकांचे हाल हाेत आहेत.
...
वन्यप्राण्यांचा वावर
या परिसरात रानडुक्कर, हरीण व इतर वन्यप्राण्यांचा वावर आहे. ते प्राणी मध्येच राेड ओलांडतात. वाहने थाेडी वेगात असल्याने तसेच मध्येच वन्यप्राणी आडवे येत असल्यानेही अपघात हाेत आहेत. एरवी या मार्गाने या भागातील विद्यार्थीही शाळेत ये-जा करण्यासाठी प्रवास करतात. सध्या काेराेना महामारीमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी या त्रासापासून वाचले आहेत. पूर्वी खड्ड्यांमुळे त्यांना अर्धा तास आधी घरून निघावे लागायचे आणि अर्धा तास उशिरा घरी पाेहाेचायचे.