लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना साथीत आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विमा कवच योजना लागू केली आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकारने कोरोना साथीत प्रतिबंधात्मक उपाययोजना,उपचार व मदत कार्य,असे कर्तव्य बजावताना कोरोना योद्ध्याचा मृत्यू झाल्यास मृताच्या वारसांना ५० लाखांचा वैयक्तिक अपघात विमा लागू केला आहे. त्यानुसार कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या मनपातील सफाई कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी नागपूर महानगरपालिका कर्मचारी संघटनेने केली आहे.मनपातील सफाई कामगार प्रमोद मुकेश मोरे यांचा २६ जुलै २०२० रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. मोरे यांनी प्रतिबंधित क्षेत्रात तसेच क्वारंटाईन सेंटरवर सफाई कर्मचारी म्हणून सेवा दिली आहे. परंतु त्यांच्या वारसांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. नुकसानभरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व नगरसेक सतीश होले व सचिव सुभाष सहारे यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (विमा योजना कोविड-१९) लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाने अधिसूचना जारी केली आहे. या अनुषंगाने मनपा आयुक्तांनी ८ एप्रिल २०२० रोजी परिपत्रक काढले आहे. ही योजना ३० सप्टेंबरपर्यंत लागू आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी कुठल्याही स्वरूपाचे हप्ते भरावयाची गरज नसल्याचे आयुक्तांनी या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. प्रमोद मोरे यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेला असल्याने त्यांच्या वारसांना विमा योजना कोविड-१९ योजनेचा तातडीने लाभ मिळावा, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.
मनपातील सफाई कामगाराचा कोरोनामुळे मृत्यू , भरपाई कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 1:47 AM