नागपूर : मनोरुग्णालयात कोरोना संक्रमण झाल्यानंतर दगावलेल्या रुग्णांच्या मृत्यूची चौकशी होऊ शकते. यासंदर्भात शहर काँग्रेसचे मानवाधिकार संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ उके यांच्या तक्रार मुख्यमंत्री कार्यालयाने संबंधित विभागाला पाठविली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने तक्रारकर्त्याला सांगितले आहे की, या प्रकरणात लवकरच योग्य पाऊल उचलले जाईल.
शासकीय मनोरुग्णालयात कोरोना संक्रमण वाढले व त्यात मनोरुग्णांचे मृत्यू झाले होते. यासंदर्भात उके यांनी मुख्यमंत्री कार्यालय, राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीत अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या पत्राला मुख्यमंत्री कार्यालयाने उत्तर पाठविले. मनोरुग्णालयात वाढत्या संक्रमणाबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. संक्रमण थांबविण्यासाठी कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा उल्लेख वृत्तात केला होता. १० मार्चपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४५० रुग्णांपैकी १२५ रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. सूत्रांच्या मते यातील ७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. संक्रमण वाढत असताना आरोग्य विभाग व रुग्णालय प्रशासनाने पावले उचलली नव्हती. रुग्णालयात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना प्रशासन अथवा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मनोरुग्णांचे लसीकरण करण्याचा प्रयत्नही केला नाही.