राकेश घानोडे
नागपूर: कोंबड्यांचे संरक्षण करण्यासाठी ताराच्या कुंपणात वीज प्रवाह सोडणाऱ्या आणि त्यामुळे एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीला बुधवारी तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, एकूण १ लाख ३० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. सत्र न्यायालयाचे न्या. राहुल भोसले यांनी हा निर्णय दिला.
बापुराव गणपत मिसर (७५) असे आरोपीचे नाव असून तो कोंढासावळी, ता. पारशिवनी येथील रहिवासी आहे. मृताचे नाव प्रदीप रामराव बावणे (२८) होते. तो देखील कोंढासावळी येथील रहिवासी होता. ही घटना २०२० मधील आहे. आरोपीने त्याच्या शेतात कोंबड्या पाळल्या होत्या. त्या कोंबड्यांचे संरक्षण करण्यासाठी तो तारेच्या कुंपणामध्ये वीज प्रवाह सोडत होता.
बावणे आरोपीच्या शेतात गेला असता त्याचा वीज प्रवाहीत कुंपणाला स्पर्श झाला. त्यामुळे तो वीजेचा जोरदार धक्का लागून जाग्यावरच मरण पावला. आरोपीने दंड जमा केल्यास ती रक्कम बावणेचे वडील व मावशी पुष्पा मेश्राम यांना समप्रमाणात विभागून द्यावी, असे न्यायालयाच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारच्या वतीने ॲड. एल. बी. शेंदरे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी विविध ठोस पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला.