लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकमेकांवर जिवापाड प्रेम. लग्नाला विरोध होईल म्हणून त्यांनी घरून पळ काढला. हैदराबादला जाऊन लग्न करायचे ठरविले. मात्र, संसार थाटण्यापूर्वीच त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. एका १९ वर्षीय तरुणीचा मालगाडीच्या धडकेत मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना ३१ मे रोजी नागपूर रेल्वे स्थानकाच्या डी कॅबिनजवळ सकाळी उघडकीस आली. मृत तरुणीची ओळख न पटल्याने लोहमार्ग पोलिसांनी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केला.पौर्णिमा (१९) रा. छिंदवाडा (काल्पनिक नाव) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती ११ व्या वर्गात शिकत होती. तिला आई-वडील, तीन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. वडील शेतकरी आहेत. तर श्रवण हा तिचा मित्र (२१) त्याच परिसरात राहतो. त्याचे वडीलही शेतकरी आहेत. मागील चार वर्षांपासून त्यांचे प्रेम आहे. लग्नाला विरोध होईल म्हणून दोघेही ३० मे रोजी घरून निघाले. नागपूर रेल्वेस्थानकावर सायंकाळी पोहोचले. हैदराबादला जाऊन लग्न करायचा निर्णय त्यांनी घेतला. दुसऱ्या दिवशी गाडी असल्याने दोघेही प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर आराम करीत होते. मध्यरात्रीच्या सुमारास पिवळा टी शर्ट घातलेले दोघे त्यांच्याजवळ आले. मुलीला पाहून त्यांनी श्रवणला मारहाण करण्यास सुरुवात केली. भीतीपोटी पौर्णिमा आणि श्रवण जीव मुठीत घेऊन पळाले आणि त्यांची ताटातूट झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ मेच्या सकाळी नागपूर रेल्वेस्थानक परिसरातील डी कॅबिनजवळ एक तरुणी मालगाडीने कटलेल्या स्थितीत असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठून जखमीला मेयो रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. उपचारादरम्यान दुपारी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सहायक उपनिरीक्षक विजय मरापे करीत आहेत. मृत पौर्णिमाची ओळख न पटल्याने तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रवण छिंदवाडा पोलिसांच्या ताब्यातदरम्यान, पौर्णिमा दिसत नसल्यामुळे कुटुंबीयांनी मिसिंगची तक्रार नोंदविली. छिंदवाडा पोलीस तपास करीत असताना श्रवणला संशयाच्या आधारावर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करून पौर्णिमाविषयी माहिती घेतली. लग्न करण्यासाठी घरून पळाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. श्रवणला घेऊन पोलीस नागपूर लोहमार्ग ठाण्यात पोहोचले. यावेळी पौर्णिमाचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांना कळले.