योगेश पांडे
नागपूर : मागील काही वर्षांत अनेकांचे जीव घेणारा, शेकडो जणांना जखमी करणारा व असंख्य पक्ष्यांसाठी काळ ठरलेला ‘नायलॉन’ मांजा यंदा बाजारात विक्रीला उपलब्ध नाही, असा दावा दुकानदार व प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात हा दावा अतिशय पोकळ असून शहरातील अनेक भागांमध्ये चोरीछुपे या जीवघेण्या ‘चायनीज’ मांज्याची विक्री सुरूच आहे. विशेष म्हणजे, नागरिकांकडूनच याची मागणी होत असल्याचे दुर्दैवी चित्र असून ‘ऑनलाइन’ माध्यमातून विक्रीवर भर देण्यात येत आहे. पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असताना मनपा प्रशासन याबाबत सुस्त असल्याचे चित्र आहे.
‘लोकमत’ने यासंदर्भात विविध विक्रेत्यांशी संपर्क साधला असता वास्तव समोर आले. पोलिसांच्या कारवाईचा ससेमिरा लक्षात घेता अनेक विक्रेते ‘ऑनलाइन’ माध्यमातून विक्री करत आहेत. काही जणांकडून ‘फेसबुक’वरच ग्राहकांशी संपर्क साधण्यात येत आहे. याशिवाय ‘इंडिया मार्ट’सारख्या संकेतस्थळांवर ‘नायलॉन’, ‘पॉलिस्टर’ मांजा विक्रीला उपलब्ध आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात प्रक्रिया केली असता संकेतस्थळावर मध्य प्रदेश, तेलंगणा येथील विक्रेत्यांचे संपर्क क्रमांक असून ‘बल्क ऑर्डर’देखील स्वीकारल्या जात असल्याची बाब समोर आली.
धोक्याची सूचना, ‘फेसबुक’वर ‘अपडेट्स’
‘फेसबुक’वर नागपुरातील एका विक्रेत्याने ‘मोनो काइट फायटर’ या नावाखाली ‘नायलॉन’चा मांजा विक्रीला ठेवला आहे. यात स्पष्टपणे ‘हा मांजा पतंग उडविण्यासाठी वापरू’ नये असे नमूद केले आहे. मात्र, तरीदेखील सहाशे रुपयांना एक चकरी या दराने मांजा उपलब्ध आहे. ए. जे. मेश्राम नावाच्या व्यक्तीकडून सहा दिवसांअगोदरच मांजा विक्रीसाठी ‘फेसबुक’वर ‘अपडेट्स’ टाकण्यात आले आहे. असे प्रकार अनेकांनी सुरू केले असून नामांकित कंपन्यांच्या मांजाच्या नावाखाली ‘नायलॉन’, ‘पॉलिस्टर’ मांजाची बिनधास्त विक्री सुरू आहे.
बाबूळखेडा, खामला, शांतीनगरातदेखील विक्री
हा मांजा विकताना दुकानदार ग्राहकांची अगोदर चाचपणी केली जात आहे व त्यानंतरच त्यांना मांजा दिला जात आहे. अगदी नवीन बाबूळखेडा, सक्करदरा चौक, महाल, न्यू इतवारी, खामला, शांतीनगर, यशोधरानगर येथील काही भागांमध्ये मांजा उपलब्ध करून दिला जात आहे. काही जण तर ग्राहकांचा फोन नंबर घेत असून नंतर मांजाचा पुरवठा करत आहेत. बंदी असल्यामुळे मांजाचे दर दोन ते तीन पटींनी वाढले असल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.
या भागात होतेय जास्त विक्री
- जुनी शुक्रवारी, इतवारी, सक्करदरा, उत्तर नागपूर, धरमपेठ, खामला, गोपालनगर यासारख्या काही भागांत ‘नायलॉन’ मांजाची विक्री सुरू.
- तपासणी पथकाची दिशाभूल करण्यासाठी ‘नायलॉन’ मांजाची प्लास्टिकच्या चक्रीत साध्या मांजामध्ये लपेटून विक्री.
- दुसऱ्या राज्यांतून रस्तेमार्गाने ‘नायलॉन’ मांजा शहरात.
-ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीतच अनेकांचा ‘स्टॉक’ शहरात
- मनपाचे पथक परतल्यानंतर सकाळी लवकर व सायंकाळी उशिरानंतर विक्रीवर भर.