नागपूर : मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक कार्यालय परिसरातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये ट्रेन मॅनेजरचा मृत्यू झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. सुनील नितनवरे (वय ५५) असे मृताचे नाव आहे. आज सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर संतप्त रेल्वे कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनावर हलगर्जीपणाा आरोप करून जोरदार नारेबाजी केली. या घटनेमुळे रात्रीपर्यंत वातावरण शोकसंतप्त होते.
सुनील नितनवरे (वय ५५) हे मध्य रेल्वेत ट्रेन मॅनेजर पदावर नागपूरच्या कंट्रोल रुममध्ये कार्यरत होते. १ जानेवारीला त्यांच्या दुचाकीला एका ऑटोचालकाने धडक दिल्याने त्यांच्या हाताच्या मनगटाला जबर दुखापत झाली. त्यामुळे ते रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. शुक्रवारी त्यांच्या मनगटाचे ऑपरेशन झाले अन् हृदयविकाचा तीव्र झटका बसल्याने त्यांचा ऑपरेशन थियेटरमध्येच मृत्यू झाला. हे वृत्त कळताच रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये एकच रोष निर्माण झाला. रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष वीरेंद्र सिंह, जी. एम. शर्मा, बंसतमणि शुक्ला, नॅशनल रेल्वे मजदूर यूनियनचे कार्याध्यक्ष हबीब खान, मंडळ अध्यक्ष नरेंद्र धानफुले, साजी कोसी, आसिफ अली, ऑल इंडिया गार्ड्स काउंसिलचे अध्यक्ष इंद्रजीत गौतम यांच्यासह अनेकांनी रेल्वे हॉस्पिटलकडे धाव घेतली.
नितनवरेच्या मृत्यूबाबत माहिती मिळविल्यानंतर रेल्वे कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी उपचारात निष्काळजीपणा झाल्यानेच नितनवरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करून डॉ. धनकिशोर यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी रेटली. प्रचंड तणाव निर्माण झाल्याचे पाहून रेल्वेचे अधिकारी पी. खैरकर, वैद्यकीय अधीक्षक डा. मंजुनाथ यांनी संतप्त कर्मचाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र, कर्मचारी अधिकच चिडले. त्यांनी नितनवरे यांचा मृतदेह बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमीका घेत घोषणाबाजी सुरू केली. मृतकाचे नातेवाईकही आक्रोश करू लागले. त्यामुळे विभागीय रेल्वे व्यवस्थापक तुषारकांत पांडे, व्यवस्थापक कृष्णनाथ पाटील यांनी तेथे पोहचून कशीबशी संतप्त जमावाची समजुत काढली. त्यानंतर नितनवरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. त्यानंतरही डीआरएम ऑफिस परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, तणाव लक्षात घेता येथे आरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले. सदर पोलीसही घटनास्थळी पोहचले होते.
इन कैमरा पोस्टमॉर्टम : डीआरएम
ही घटना अतिशय दुर्दैवी असून नितनवरे यांचे शवविच्छेदन ईन कॅमेरा केले जाईल. त्याच्या अहवालाच्या आधारे एक समिती चाैकशी करेल आणि त्या कमिटीच्या आधारे संबंधितांवर आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचे डीआरएम पांडे यांनी लोकमतला सांगितले. मृत नितनवरे यांच्या कुटुंबियांना शक्य ती सर्व मदत रेल्वे प्रशासनाकडून केली जाईल, असेही पांडे म्हणाले.
कर्मचारी बाहेर, कंट्रोल रूमचे काम ठप्प
या घटनेमुळे शोकसंतप्त कर्मचाऱ्यांनी काम सोडून रेल्वे हॉस्पिटल परिसरात धाव घेत जोरदार निदर्शने केली. त्यामुळे कंट्रोल रुमचे काम ठप्प झाले. परिणामी अनेक रेल्वेगाड्यांचे संचालन प्रभावित झाल्याची वृत्त लिहितानाची स्थिती होती. यावेळी हाताचे ऑपरेशन करायला गेलेल्या नितनवरे यांचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा हॉस्पिटल व्यवस्थापन आणि तेथील कार्यप्रणाली आरोपीच्या पिंजऱ्यात आली आहे.
निष्काळजीपणा नेहमीचाच, यापुर्वीही घडल्या घटना
या घटनेनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांचा रोष उफाळून आला. रेल्वे हॉस्पिटलमध्ये यापूर्वीही अशा घटना घडल्याचा आरोप करण्यात आला. योग्य उपचाराअभावी एनआरएमयूचे कार्याध्यक्ष हबीब खान यांचा एक डोळा निकामी झाल्याचा आरोप त्यांनी लावला. तर, पत्नीला वेळेवर योग्य ते उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता, असाही गंभीर आरोप हबीब खान यांनी केला.