प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू, हायकोर्टाची गंभीर दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 01:22 PM2023-02-14T13:22:20+5:302023-02-14T13:24:02+5:30
वर्धा जिल्ह्यातील प्रकरण : पोलिसांना मागितला अहवाल
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आर्वी (जि. वर्धा) येथील एका नवप्रसूत महिलेच्या मृत्यूची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणात आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिस निरीक्षकांना देण्यात आले आहेत. तसेच, आरोग्य उपसंचालकांना ही स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांना १० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांच्या समक्ष सुनावणी झाली. मृत महिलेचे पती अभिजित डवरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती केली आहे. डवरे यांच्या पत्नीला प्रसूती करिता ३ सप्टेंबर २०२१ रोजी आर्वी येथील राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. प्रसूतीनंतर सायंकाळी ७ च्या सुमारास त्यांच्या पत्नीला उलट्या व पोट झोंबून येण्याचा त्रास सुरू झाला. परंतु, हॉस्पिटल प्रमुख डॉ. कालिंदी राणे यांनी रात्री ९.३० वाजेपर्यंत उपचार सुरू केले नाही. त्यामुळे, डवरे यांच्या पत्नीची प्रकृती खालावली व त्या रात्री १२.३० च्या सुमारास मरण पावल्या. परिणामी, डवरे यांनी आर्वी पोलिस ठाण्यात तक्रार केली असता, अकस्मात मृत्यूची नोंद करून जिल्हा शल्य चिकित्सकांना मृत्यू संदर्भात अहवाल मागण्यात आला. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सकांनी अहवाल देण्यासाठी एक वर्ष वेळ घेतला व डॉक्टरांनी वैद्यकीय निष्काळजीपणा केला नसल्याचा निष्कर्ष कळविला, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. तसेच, या सर्व प्रक्रियेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. सपना जाधव यांनी कामकाज पाहिले.
या प्रकरणात आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झाला नाही. संबंधित महिलेचा जीव वाचविण्याकरिता आम्ही शर्तीचे प्रयत्न केले. वैद्यकीय अहवाल, शवविच्छेदन अहवाल व पोलिस अहवाल यामध्ये डॉक्टरची चूक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असताना डॉक्टरची बदनामी करण्याच्या उद्देशाने हे प्रकरण वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. न्यायालयाचा कोणताही आदेश आम्हाला मान्य राहील.
- डॉ. कालिंदी राणे