जलालखेडा : जाेरात कडाडलेली वीज थेट झाडावर काेसळल्याने झाडाखाली बांधून असलेल्या बैल व गायीचा हाेरपळून घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भिष्णूर शिवारात मंगळवारी (दि. १८) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
नरखेड तालुक्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, अधूनमधून अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. तालुक्याच्या काळा भागात मंगळवारी सकाळपासूनच पाऊस बरसायला सुरुवात झाली. दरम्यान, भाेजराज पुंड, रा. भिष्णूर, ता. नरखेड यांची भिष्णूर शिवारात शेती असून, त्यांनी त्यांची बैलजाेडी व गाय शेतातील झाडाखाली बांधून ठेवली हाेती. या शिवारात दुपारी ३ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यातच जाेरात कडाडलेली वीज थेट झाडावर काेसळली. त्यामुळे झाडाखाली बांधलेले बैल व गाय हाेरपळल्याने गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. हिंमत बनाईत यांनी घटनास्थळ गाठले. ताेपर्यंत या दाेन्ही गुरांचा मृत्यू झाला हाेता.
यात किमान ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती भाेजराज पुंड यांनी दिली. उत्तरीय तपासणी डाॅ. हिंमत बानाईत यांनी उत्तरीय तपासणी प्रक्रिया पूर्ण पूर्ण केली. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक तलाठ्याने दिली. दुसरीकडे, शासनाने या शेतकऱ्याला नुकसानभरपाईपाेटी आर्थिक मदत करावी, अशी मागणी पंचायत समिती सभापती नीलिमा रेतवकर, सतीश रेवतकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.