कन्टेन्मेंट झोनमधील त्या रुग्णाचा मृत्यू प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे : काँग्रेसचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 11:45 PM2020-05-29T23:45:53+5:302020-05-29T23:47:15+5:30
मोमिनपुरा येथील हार्ट अटॅक आलेल्या वृद्ध रुग्णाचा मृत्यू हा केवळ प्रशासनाचे दुर्लक्ष व आडमुठेपणामुळेच झाल्याचा आरोप करीत काँग्रेस ने शुक्रवारी विभागीय आयुक्तांच्या कक्षात ठाण मांडले. सोबतच नगरसेवक नितीन साठवणे यांच्या विरोधातील गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणीही लावून धरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोमिनपुरा येथील हार्ट अटॅक आलेल्या वृद्ध रुग्णाचा मृत्यू हा केवळ प्रशासनाचे दुर्लक्ष व आडमुठेपणामुळेच झाल्याचा आरोप करीत काँग्रेस ने शुक्रवारी विभागीय आयुक्तांच्या कक्षात ठाण मांडले. सोबतच नगरसेवक नितीन साठवणे यांच्या विरोधातील गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणीही लावून धरली.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी दुपारी विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांचा कक्ष गाठत ठाण मांडले. यावेळी आ. ठाकरे म्हणाले, मोमीनपुऱ्यातील संबंधित रुग्णाला प्रतिबंधित क्षेत्र असल्याने वेळेवर उपचार मिळाले नाहीत. तसेच डॉक्टरही या भागात उपचारासाठी आले नाही. शासनाच्या निर्देशानुसार प्रतिबंधित क्षेत्रात ‘मोबाईल डॉक्टर व्हॅन’असणे गरजेचे आहे. परंतु नागपूर शहरात प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांसाठी अशी सुविधा कोठेही उपलब्ध नाही. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहराला वेठीस धरले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
शहरातील कोणत्याही भागात प्रतिबंधित किवा विलगीकरणाची कारवाई करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, कोरोनासंबंधी परिस्थिती कशी नियंत्रणात येईल याविषयी शहरातील आमदार, मंत्री यांनाही विचारून कारवाई करावी, चौथ्या लॉकडाऊननंतर शासनाने जी अंशत: शिथिलता दिली आहे त्यामुळे इतर शहरांमधून नागरिक जे नागपूर शहरात चारचाकी किवा खासगी वाहनांनी परत येत आहेत, त्या सर्व नागरिकांची नोंद विमानतळ व रेल्वे स्टेशनवरील नोंदीसारख्याच कराव्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शिष्टमंडळात अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, नगरसेवक संजय महाकाळकर, संदीप सहारे, पुरुषोत्तम हजारे, मनोज सांगोळे, मनोज गावंडे, नितीन पुणेकर, हरीश ग्वालबंशी, नितीश ग्वालबंशी, रश्मी उईके, दर्शनी धवड, साक्षी राऊत, उज्ज्वला बनकर, लोणारे आदींचा समावेश होता.