लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात दोन आठवड्यांपूर्वी रुग्णसंख्या तीन हजारांवर गेली होती, तर मृत्यूच्या संख्येने शंभरी गाठली होती, परंतु आता ती निम्म्यावर आली आहे. रविवारी १५८९ रुग्ण व ५१ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १५६६६९ तर मृत्यूची संख्या ४२१२ झाली आहे. मृत्यूचे प्रमाण २.६८वर आले आहे.
नागपूर जिल्ह्यातही रुग्णसंख्या मंदावली आहे. ६१७ रुग्णांची नोंद झाली असून २७ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ८१४६१ तर मृतांची संख्या २६२३ झाली आहे. विशेष म्हणजे, नव्या रुग्णांच्या तुलनेत दुप्पट रुग्ण बरे होऊ लागले आहेत. नागपुरनंतर अमरावती जिल्ह्यात आज सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली. १० रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांची संख्या ३११वर पोहचली. जिल्ह्यात १३९ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून रुग्णसंख्या १४००६ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १५९ रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले. रुग्णसंख्या ११०२६ झाली आहे.
चार रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या १६७ वर गेली आहे. बुलढाणा जिल्ह्यात आज १३९ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या ७६४८ झाली. गडचिरोली जिल्ह्यात १११ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या ३१९७वर पोहचली. गोंदिया जिल्ह्यात १२० रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ७४६७ झाली आहे. भंडारा जिल्ह्यात १०६ रुग्ण व तीन रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या ५९९० तर मृतांची संख्या १३६ वर गेली आहे.
वर्धा जिल्ह्यात सहा रुग्णांचे मृत्यूने बळींची संख्या १४० झाली. ८४ नव्या रुग्णांची भर पडली असून रुग्णसंख्या ४९३६ वर गेली आहे. वाशिम जिल्ह्यात ६८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. अकोल्यात २५ रुग्ण व एकाचा मृत्यूची नोंद झाली. सर्वात कमी रुग्णाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात झाली. २२ रुग्ण पॉझिटिव्ह आले.