त्या आरोपींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत परिवर्तित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 08:28 PM2019-11-05T20:28:43+5:302019-11-05T20:30:35+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भंडारा येथील बहुचर्चित प्रीती बारिया खून प्रकरणातील आरोपी अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेच्या शिक्षेत परिवर्तित केली.

The death sentence of both the accused changed to life imprisonment | त्या आरोपींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत परिवर्तित

त्या आरोपींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत परिवर्तित

Next
ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : भंडाऱ्यातील प्रीती बारिया खून प्रकरण

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भंडारा येथील बहुचर्चित प्रीती बारिया खून प्रकरणातील आरोपी अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेच्या शिक्षेत परिवर्तित केली. ही दुर्मिळ घटना नाही. त्यामुळे या आरोपींसाठी जन्मठेपेची शिक्षा योग्य आहे असा निष्कर्ष न्यायालयाने निर्णयात नोंदवला. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.
३० जून २०१८ रोजी भंडारा सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना फाशीची कमाल शिक्षा सुनावली होती. ती शिक्षा कायम करण्यासाठी प्रकरण उच्च न्यायालयात सादर करण्यात आले होते. तसेच, आरोपींनी अपीलद्वारे सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यावर उच्च न्यायालयात ३० ऑगस्ट २०१९ रोजी अंतिम सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर राखून ठेवण्यात आलेला निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आला. उच्च न्यायालयाने केवळ फाशीच्या शिक्षेत बदल केला आहे. आरोपींची अन्य शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. आरोपींना कारावासाच्या सर्व शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत.
शेख हा अश्रफीनगर तर, राऊत हा उद्योगनगर येथील रहिवासी असून दोघेही व्यवसायाने एसी मेकॅनिक आहेत. ही घटना ३० जुलै २०१५ रोजी घडली होती. तकिया वॉर्डमधील समृद्धीनगरात बारिया यांचे घर आहे. आरोपींनी सायंकाळी ७.३० च्या सुमारास एसी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांचा खरा उद्देश दरोडा टाकण्याचा होता. दरम्यान, त्यांनी संधी पाहून प्रीती बारिया (३०) यांना डोक्यावर हातोडीने वार करून ठार मारले. त्याचवेळी बारिया यांचा मुलगा भव्य (९) त्या ठिकाणी आला असता आरोपींनी त्याच्याही डोक्यावर हातोडीने वार केले. त्यामुळे भव्यला कायमचे अपंगत्व आले. त्यापूर्वी आरोपींनी दुपारी म्हाडा कॉलनीतील रवींद्र शिंदे यांच्या घरीदेखील एसी दुरुस्तीच्या बहाण्याने प्रवेश केला होता व त्यांची मुलगी अश्विनी हिच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने वार केले होते. तेव्हापासून अश्विनीलाही कायमचे अपंगत्व आले. एसी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करणे, संधी पाहून घरातील व्यक्तींचा खून करणे व त्यानंतर घरातील मुद्देमाल चोरून नेणे ही आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत होती. उच्च न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. नीरज जावडे, आरोपींतर्फे अ‍ॅड. ओमप्रकाश गुप्ता तर, बारियातर्फे अ‍ॅड. नीरज खांदेवाले यांनी कामकाज पाहिले.

Web Title: The death sentence of both the accused changed to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.