आईचा खून करणाऱ्या मुलाची फाशीची शिक्षा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 11:25 PM2019-08-08T23:25:35+5:302019-08-08T23:28:57+5:30
संपत्तीच्या वादातून आपल्या आईवर चाकूने वार करून तिचा खून करणाऱ्या मुलाला चंद्रपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. ही शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपत्तीच्या वादातून आपल्या आईवर चाकूने वार करून तिचा खून करणाऱ्या मुलाला चंद्रपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. ही शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली. या प्रकणात काही पुरावे तपासल्या गेले नाही. आरोपीला आपला पक्ष मांडण्यासाठी संधी मिळाली नसल्यामुळे सत्र न्यायालयाला या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करून निकाल देण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
आरोपी चंद्रपूर जिल्ह्यातील तुकुम येथील रहिवासी कौस्तुभ हेमंत कुळकर्णी आहे. आरोपीचे मोबाईलचे दुकान होते. त्याच्यावर खूप कर्ज झाले होते. कर्ज फेडण्यासाठी तो वडिलांची संपत्ती विकण्याच्या प्रयत्नात होता. परंतु त्याच्या या निर्णयाला त्याची आई विरोध करीत होती. २० एप्रिल २०१६ रोजी वडील आणि त्याची पत्नी घरी नसताना आरोपीने आईसोबत वाद घातला. रागाच्या भरात त्याने आईवर चाकूने वार केला. यात त्याच्या आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. आरोपीने खून केल्यानंतर घराची सफाई केली. त्यानंतर तो बाहेर निघून गेला. काही वेळानंतर त्याचे वडील आणि पत्नी घरी परतली. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान, त्याने आपल्या पत्नीच्या मोबाईलवर मॅसेज पाठवून खून केल्याची कबुली दिली होती. या प्रकरणात चंद्रपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. त्याच्याविरुद्ध चंद्रपूर येथील सत्र न्यायालयात प्रकरण चालविण्यात आले. सर्व पुरावे तपासल्यानंतर २३ मे २०१८ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती.