नागपूर : वर्धमाननगर येथील निवासी व जैन समाजाचे ज्येष्ठ सदस्य श्री बिरदीचंदजी चोरडिया यांचे सोमवारी २६ जुलै रोजी निधन झाले. ते ९९ वर्षाचे होते. ते विनोदकुमार व मोहनकुमार चोरडिया यांचे वडील आणि प्रशांत चोरडिया यांचे आजोबा होत. जैन समाजातील सदस्यांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. स्व. बिरदीचंदजी चोरडिया यांचे आयुष्य सदैव जैन समाजाच्या उत्थानासाठी समर्पित राहिले. सामाजिक दानशूर श्रेष्ठींमध्ये स्व. बिरदीचंदजी चोरडिया यांचे नाव अग्रक्रमावर राहिले आहे. त्यांनी सदैव कमकुवत वर्गातील लोकांना आर्थिक मदत व आधार देत त्यांना समाजाच्या मुख्यधारेत आणण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने जैन समुदायासह शहरातील समस्त सामाजिक, व्यापारी आणि धार्मिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. समृद्ध समाज निर्माणात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे समाजसुधारक बिरदीचंदजी यांच्या निधनाने सर्व स्तरातील नागरिकांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे स्व. चोरडिया यांनी अनेक वर्षे नागपूर रेल्वे स्टेशनवर तीव्र उन्हात प्रवाशांना पिण्याचे पाणी पाजण्याचे पुण्यकार्य केले. बिरदीचंद चोरडिया यांच्या निधनावर माजी खासदार अजय संचेती, सकल जैन समाजाचे पदाधिकारी निखिल कुसुमगर, अनिल पारख, संतोष पेंढारी, नरेश पाटनी, उज्ज्वल पगारिया, मनीष मेहता, नितीन खारा, दिलीप रांका, सुरेंद्र लोढा, अनुज बडजात्या, अतुल कोटेचा, श्रीमती माधुरी बोरा आदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
समाजात बनवली वेगळी ओळख
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. स्व. बिरदीचंद चोरडिया (मामाजी) मितभाषी व सरळ स्वभावाचे धनी होते. समाजात त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. जवळपास ३० वर्षापूर्वी सकल जैन समाजाच्यावतीने पुज्य. प्रीती सुधाजी (म.सा.) यांचा चातुर्मास आयोजित करण्यात आला होता. यात स्व. चोरडिया यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. हा चातुर्मास केवळ जैन समाजाचा नसून प्रत्येक नागरिकांचा होता. या भव्य आयोजनात देशभरातील लोक सहभागी झाले होते. यात भोजनशाळेची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी बिरदीचंदजी चोरडिया यांनी पार पाडल्याचे विजय दर्डा म्हणाले.
..........