कॉटन मार्केट परिसरातील घटना : दुचाकीवर होता विद्यार्थी नागपूर : भरधाव कारचालकाने धडक मारल्यामुळे दुचाकीवर असलेल्या एका विद्यार्थ्याचा करुण अंत झाला. तुषार संजय कौशिक (वय १४) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बसस्थानकाजवळच्या गार्डन एन्क्लेवजवळ राहत होता. दहावीचा विद्यार्थी असलेला तुषार त्याच्या मामेभावासोबत रविवारी सकाळी सीताबर्डीत आला होता. सकाळी ९ ते ९.३० च्या सुमारास तो कॉटन मार्केट जवळच्या एनएमसी ब्रीजजवळून परत घराकडे जात होता. त्याला एमएच ४०/ एआर ०५४५ क्रमांकाच्या भरधाव अर्टिका कारचालकाने जोरदार धडक मारली. त्यात तुषारच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्याला मेडिकलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान तुषारला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तुषारच्या मृत्यूच्या वार्तेने त्याच्या कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला. धंतोलीच्या महिला उपनिरीक्षक वाघ यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. रात्रीपर्यंत आरोपी वाहनचालकाला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले नव्हते.(प्रतिनिधी) बघ्यांची गर्दी अन् पोलिसांची व्हॅन हा अपघात झाल्यानंतर पुलाजवळ बघ्यांची प्रचंड गर्दी जमली. त्याचवेळी पोलिसांचे एक वाहन आले. जखमीला तातडीने मदत मिळेल, असे समजून गर्दीतील बघे पोलिसांच्या वाहनाकडे बघत राहिले. मात्र, पोलिसांनी गर्दी पाहूनही काय झाले, ते माहीत करून घेण्याची तसदी न घेता वाहनातील पोलीस वेगात पुढे निघून गेले. यामुळे गर्दीतील नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या.
भरधाव कारच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Published: August 01, 2016 2:11 AM