कन्हान : चाैघांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गहुहिवरा शिवारात रविवारी (दि.२८) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली हाेती. या प्रकरणात चाैघांना अटक करण्यात आली असून, त्यात एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.
पुंडरेश ऊर्फ अंकित पंडेश्वरी सिंग (४०, रा. कांद्री, कन्हान) असे मृताचे नाव आहे. रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास चाैघांपैकी एकाने दारूची बाटली पुलावरून खाली फेकली. त्यामुळे जखमी झालेल्या तरुणाने याबाबत विचारणा केली असता, चिडलेल्या चाैघांनी चाकूने वार करून एकास व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुसऱ्यास गंभीर जखमी केले. दरम्यान, जखमी संकेत प्रेमशंकर तिवारी (३१, रा. कांद्री, कन्हान) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नाेंदवून आराेपी विधीत ऊर्फ माैसी पंजाब काेमटे (२३), सुवंश कुनदीपसिंग खंडुजे (१८, दाेघेही रा. शिवनगर, कन्हान, ता. पारशिवनी), लक्की अरविंद नाईक (२०, रा. अशोकनगर, कन्हान) या तिघांसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकास अटक करण्यात आली हाेती. बुधवारी (दि. ३) अंकित सिंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात नव्याने आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पाेलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांनी दिली.