लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सलग तिसऱ्या दिवशी दोघांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. मृतांची संख्या ३४ झाली आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये दहा मृत्यूची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. आज शहरातून ५७ तर ग्रामीणमधून १२ अशा एकूण ६९ रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या २,१७९ वर पोहचली आहे.
रॅपिड अॅण्टीजेन चाचणीला नागपुरातही सुरुवात झाली आहे. या चाचणीचा अहवाल केवळ १५ ते ३० मिनिटांत येतो. यामुळे जास्तीत जास्त संशयितांची चाचणी होत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. दुसरीकडे तिसऱ्या दिवशी पुन्हा दोन मृत्यूची नोंद झाली. हंसापुरी येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्ण हा ५ जुलै रोजी गंभीर स्थितीत मेयोत दाखल झाला होता. रुग्णाला ‘सारी’ आजारासोबतच उच्च रक्तदाब व टाईप टू मधुमेहाचा गंभीर आजार होता. उपचार सुरू असताना रुग्णाचा मृत्यू झाला. दुसरा मृत्यू रेणुकानगरी मनीषनगर येथील ४९ वर्षीय पुरुष रुग्णाचा आहे. या रुग्णाला २८ जून रोजी मेयोत दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज दुपारी मृत्यू झाला. या रुग्णाला उच्च रक्तदाब, टाईप टू मधुमेह व थॅलेसेमियाचा आजार होता.
या वसाहतींमधून पॉझिटिव्ह आले ५७ रुग्ण
आज पॉझिटिव्ह आलेल्या शहरातील रुग्णांमध्ये दिघोरी येथील एक, मेकोसाबाग येथील तीन, जरीपटका येथील चार, भोईपुरा बजेरिया येथील दोन, बजेरिया येथील दोन, ताजबाग येथील एक, यशोधरानगर येथील दोन, रामदासपेठ येथील एक, सुर्वे ले-आऊट येथील एक, मानेवाडा येथील एक, जुनी मंगळवारी येथील एक, सूर्यनगर येथील चार, दाभा येथील एक, पोलीस लाईन टाकळी येथील तीन, आठवा मैल येथील दोन, हजारीपहाड येथील चार, फ्रेंड्स कॉलनी येथील एक, सहयोगनगर येथील एक, आरपीटीएसमधील एक तर नाईक तलाव व बांगलादेश येथील २० असे एकूण ५७ रुग्ण शहरातून पॉझिटिव्ह आले. या शिवाय, मेडिकलमधून २० तर मेयोमधून चार अशा २४ रुग्णांना सुटी देण्यात आली. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १,४५२ झाली आहे.
कामठी तालुक्यात १२ रुग्ण पॉझिटिव्ह
कामठी तालुक्यात आज १२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात बोरियापुरा कामठी येथील दोन, छत्रपतीनगर नवीन कामठी येथे दोन, न्यू खलाशी लाईन, तुमडीपुरा, बजरंग पार्क, कोळसाताल येथील प्रत्येकी एक, टीचर कॉलनी न्यू येरखेडा येथील दोन तर इतर ठिकाणांहून दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. यांच्या संपर्कातील सुमारे २० संशयितांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आहे. कामठी तालुक्यात बाधितांची एकूण संख्या ४० झाली आहे.
संशयित : २,३४३
अहवाल प्राप्त : २९,३८६बाधित रुग्ण : २,१७९
घरी सोडलेले : १,४५२ मृत्यू : ३४