नागपूर : कोरोनाबाधितांच्या मृत्यूदरात सातत्याने वाढ होत असल्याने नागपूरकर दहशतीत आले आहेत. रविवारी ५८ रुग्णांचे मृत्यू झाले. सलग दुस-या दिवशी मृत्यूसंख्येने उच्चांक गाठला. रुग्णसंख्येतही वाढ झाली. ३,९७० रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या २,१८,८२० झाली असून मृतांची संख्या ४,९३१ वर पोहोचली. विशेष म्हणजे, राज्यात शनिवारी मृत्यूदर २.०४ टक्के होता. नागपूर जिल्ह्यात रविवारी हा दर २.२५ टक्क्यांवर गेला. कोरोनाचे सावट अधिक गडद होत आहे.
नागपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून १६ ते १७ हजारांच्या घरात दैनंदिन चाचण्या होत आहेत. परंतु रोज आढळून येणा-या रुग्णसंख्येच्या तुलनेत या चाचण्या कमी आहेत. यात दुप्पटीने वाढ होण्याची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे. रविवारी १६,१५५ चाचण्या झाल्या. यात १२,९७१ आरटीपीसीआर तर ३,१८४ रॅपीड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. आरटीपीसीआरमधून ३,८७२ तर अँटिजेनमधून ९८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रविवारी पुन्हा एकदा बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. ३,४७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १,७६,११३ वर गेली.
-शहरात २९५० तर, ग्रामीणमध्ये १०१७ रुग्ण
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरात २,९५० तर ग्रामीणमध्ये १,०१७ रुग्ण आढळून आले. मृतांमध्ये शहरातील ३७ तर ग्रामीणमधील १८ मृत्यू आहेत. नागपूर जिल्ह्यात ३७,७७६ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यातील शहरात २७,६३९ तर ग्रामीणमध्ये १०,१३७ आहेत. सक्रिय रुग्णांमध्ये गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.
-एम्स, मेयो फुल्ल, मेडिकलमध्ये मोजक्याच खाटा
शासकीय रुग्णालय असलेल्या एम्स, मेयोमधील खाटा फुल्ल झाल्या असून मेडिकलमध्ये मोजक्याच खाटा उपलब्ध आहेत. सध्या एम्समध्ये ६१, मेयोमध्ये ५१० तर मेडिकलमध्ये ४७७ रुग्ण उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे, कोविड संशयित, सारी, कोविड प्रसूती, सर्जरी, पेडियाट्रिक व डायलिसीसच्या रुग्णांसाठी राखीव खाटा ठेवल्या जातात. त्या ठिकाणी इतर रुग्णांना ठेवता येत नाही. परिणामी, खाटांच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी दिसून असल्याचे या रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
कोरोनाची स्थिती
दैनिक चाचण्या: १६,१५५
ए. बाधित रुग्ण :२,१८,८२०
सक्रिय रुग्ण : ३७,७७६
बरे झालेले रुग्ण :१,७६,११३
ए. मृत्यू : ४,९३१