नागपूर : कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र होताना दिसून येत आहे. शनिवारी मृत्युसंख्येने उच्चांक गाठला. २४ तासांत ५४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ३६८८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. मृतांची एकूण संख्या ४८७३ तर मृतांची संख्या २,१४,८५० झाली. वाढत्या रुग्णसंख्येत गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने मेयो, मेडिकल, एम्ससह खासगी रुग्णालयात अपुऱ्या खाटांची समस्या निर्माण झाली आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक मृतांची नोंद १७ सप्टेंबर २०२० रोजी झाली. एकाच दिवशी ६४ रुग्णांचे बळी गेले होते. त्यानंतर २७ सप्टेंबर रोजी ४३ तर ३ ऑक्टोबर रोजी ४६ मृत्यूंची नोंद झाली. मात्र, त्यानंतर मृत्यूच्या संख्येत घट आली. जानेवारी महिन्यात शहरात शून्य मृत्यूची नोंदही झाली. फेब्रुवारी महिन्यात ५ ते १३ दरम्यान रुग्णांचे मृत्यू झाले होते. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मृतांमध्ये वाढ होऊ लागली. १२ मार्च रोजी १५ मृत्यूंची नोंद झाली. त्यानंतर १८ मार्च रोजी २३, १० मार्च रोजी ३५, २२ मार्च रोजी ४०, २५ मार्च रोजी ४७ तर आज २७ मार्च रोजी सर्वाधिक ५४ मृत्यू नोंदविण्यात आले आहेत.
-शहरातील ३३ तर ग्रामीणमधील १७ रुग्णांचे बळी
नागपूर जिल्ह्यात एकूण मृतांमध्ये शहरातील ३३ तर, ग्रामीणमधील १७ मृत्यूंचा समावेश आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरातील २५९५ तर ग्रामीणमधील १०८९ रुग्ण आहेत. शहरात आतापर्यंत मृतांची संख्या ३११६ व रुग्णांची संख्या १,६९,८१० झाली असून ग्रामीणमध्ये मृतांची संख्या ९१७ व रुग्णांची संख्या ४४,०१८ वर पोहोचली आहे. सध्या ३७,३४३ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यातील ८,४५९ रुग्ण रुग्णालयात तर २८,८८४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
-३,२२७ रुग्णांची कोरोनावर मात
कोरोनाबाधितांच्या व मृतांच्या वाढत्या संख्येने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना, दिलासादायक बाब समोर आली. शनिवारी ३,२२७ रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्या रुग्णांचा हा विक्रम आहे. आतापर्यंत १,७२,६३४ रुग्ण बरे झाले आहेत. याचा दर ८०.३५ टक्के आहे. आज जिल्ह्यात १६,६३६ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या.
-मार्च महिन्यात असे वाढले मृत्यू
१ मार्च : ६ मृत्यू
५ मार्च : ०९ मृत्यू
१० मार्च : ०८ मृत्यू
१५ मार्च : १२ मृत्यू
२० मार्च : २९ मृत्यू
२५ मार्च : ४७ मृत्यू
२७ मार्च : ५४ मृत्यू
कोरोनाची स्थिती
दैनिक चाचण्या : १६,५३५
एकूण बाधित रुग्ण :२,१४,८५०
सक्रिय रुग्ण : ३७,३४३
बरे झालेले रुग्ण : १,७२,६३४
एकूण मृत्यू : ४८७३