लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची तक्रार पतीने रविवारी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात केली. या घटनेने सोमवारी पेठ येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील सोईसुविधांवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत.रुतिका थोटे (२७) रा. नरसाळा, असे मृताचे नाव आहे. रुतिकाला पहिल्या दोन मुली आहेत. तिसऱ्या प्रसुतीसाठी १५ एप्रिल रोजी कामगार विमा रुग्णालयात तिला दाखल केले. तिसरी प्रसुती असल्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याची विनंती थोटे कुटुंबाने डॉक्टरांना केली. त्यानुसार १६ एप्रिल रोजी सीझर करून प्रसुती करण्याचा व त्याचवेळी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला. रुतिकाचे पती दामोधर थोटे यांच्या तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी १२.४० वाजता रुतिकाने मुलीला जन्म दिला. जन्मलेले बाळ दाखविण्यातही आले. सर्व काही सामान्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेला सुरुवात केली.दुपारी २ वाजता अचानक डॉक्टरांनी आत बोलावून काही इंजेक्शन बाहेरून विकत घेऊन आणण्यास सांगितले. इंजेक्शन आणून दिल्यावर डॉक्टरांनी पत्नीची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती दिली. इंजेक्शन दिल्यानंतरही रक्तस्राव थांबला नाहीतर मेडिकलमध्ये न्यावे लागेल असेही सांगितले. दुपारी २.३० वाजता डॉक्टरांनी तातडीने मेडिकलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले.मेडिकलमध्ये दाखल केल्यावर उपचार सुरू झाले, परंतु सायंकाळी ६ वाजता डॉक्टरांनी पत्नीला मृत घोषित केले. कामगार रुग्णालयात सिझर किंवा कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाल्यामुळेच पत्नीची प्रकृती गंभीर होऊन तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने आठ वर्षीय, चार वर्षीय आणि पाच दिवसांची तीन मुली आईच्या प्रेमाला मुकल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ‘लोकमत’शी बोलताना मृताचा भाऊ विशाल बोडके म्हणाला की, याची तक्रार इंडियन मेडिकल असोसिएशनकडेही करणार आहे.
नागपुरात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बेतली बाळंतिणीच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:09 AM
कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची तक्रार पतीने रविवारी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात केली.
ठळक मुद्देकामगार रुग्णालयातील प्रकारपतीची पोलिसात तक्रार