‘इन्फ्लूएन्झा ए’ ठरला घातक : शर्थीचे उपचारही कमी पडलेनागपूर : महापालिकेचे नवनिर्वाचित भाजपाचे नगरसेवक नीलेश कुंभारे यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते ३४ वर्षांचे होते. कुंभारे यांचा मृत्यू ‘इन्फ्लूएन्झा ए’ या व्हायरसने झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या आजारामुळे फुफ्फसे पूर्णत: निकामी झाली होती, तरीही त्यांच्यावर शर्थीचे उपचार सुरू होते. कृत्रिम फुफ्फुसाचे काम करणाऱ्या ‘इक्मो’ यंत्रावर त्यांना ठेवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ असा आप्तपरिवार आहे.नीलेश कुंभारे हे भाजपाच्या तिकीटवर प्रभाग क्रमांक ३५ मधून निवडून आले होते. त्यांनी एमबीएपर्यंत उच्च शिक्षण घेतले होते. ते बांधकाम व्यावसायिक होते. नीलेश कुंभारे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शंकरनगर येथील खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. स्वाईन फ्लू संशयित म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. ते व्हेंटीलेटरवर होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे फुफ्फुस खराब झाले होते. यामुळे कृत्रिम फुफ्फुसाचे काम करणाऱ्या ‘इक्मो’ यंत्रावर त्यांना ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. याचदरम्यान त्यांना ‘एअर अॅम्ब्युलन्स’ने मुंबईला नेण्याचे प्रयत्न झाले. परंतु सूत्रानुसार, स्वाईन फ्लू संशयित असल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्स नाकारण्यात आली. याच दरम्यान ‘इक्मो’ नावाचे यंत्र नागपुरातील ‘न्यू ईरा’ इस्पितळात असल्याचे कळताच कुंभारे यांना या इस्पितळात दाखल करण्यात आले. तब्बल ११ दिवस कुंभारे यांनी मृत्यूशी झुंज दिली.महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत नीलेश कुंभारे बसपाकडून लढले होते. परंतु पराभूत झाले होते. यावेळी त्यांनी भाजपाच्या तिकीटवर निवडणूक लढविली व विजयी झाले होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी मानेवाडा स्मशानभूमीत मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, भाजपाचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार डॉ. मिलिंद माने, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, जलप्रदाय समितीचे सभापती राजेश घोडपागे, कर आकारणी व कर संकलन समितीचे सभापती अविनाश ठाकरे, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, क्रीडा सभापती नागेश सहारे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश सिंगारे व झोन सभापती भगवान मेंढे आदींनी नीलेश कुंभारे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. (प्रतिनिधी)प्रयत्न अपयशी ठरले कुंभारे यांना रुग्णालयात आणताच त्यांना तातडीने ‘इक्मो’ यंत्र लावून उपचार सुरू केले. तब्बल ११ दिवस उपचाराला साथ दिली. मात्र, ‘इन्फ्लूएन्झा ए’ या व्हायरसने त्यांची फुफ्फुसे पूर्णत: निकामी झाल्याने दुर्दैवाने मृत्यू झाला. नीलेशचा जीव वाचविण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले.- डॉ. आनंद संचेतीसंचालक, न्यू ईरा हॉस्पिटल
तरुण नगरसेवकाचा आजाराने मृत्यू
By admin | Published: April 11, 2017 1:53 AM