आत्महत्येची शक्यता : नरेंद्रनगर पुलावरून घेतली ‘ओएचई’ तारेवर उडी नागपूर : स्वर्णजयंती एक्स्प्रेसच्या इंजिनला विद्युत पुरवठा करणाऱ्या पेंटोमध्ये अडकून एका २४ वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. यामुळे ही गाडी आपोआप जागेवर बंद पडून दुसरे इंजिन आल्यानंतर दोन तासांनी ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. मृत युवकाने आत्महत्या केल्याची शक्यता लोहमार्ग पोलिसांनी वर्तविली आहे. रोशन मनोहर मेश्राम रा. बुध्दनगर. सोमलवाडा असे मृत युवकाचे नाव आहे. तो घाटे रोड येथील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे. निजामुद्दीन-तिरुअनंतपुरम स्वर्णजयंती एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकावर नियमितपणे रात्री ११.१५ वाजता येते. परंतु शुक्रवारी ही गाडी नागपुरात विलंबाने आली. नागपुरातून ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाल्यानंतर खापरी रेल्वेस्थानकानंतर या गाडीचे इंजिन अचानक बंद पडले. यामुळे या गाडीचा लोकोपायलटही गोंधळला. त्याने काय झाले याचा शोध घेतला परंतु त्यास काहीच समजले नाही. त्यानंतर इंजिनची देखभाल करणाऱ्या रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना इंजिनच्या दुसऱ्या बाजूने रक्त खाली पडताना दिसले. त्यांनी लगेच या घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना दिली. नियंत्रण कक्षाने लोहमार्ग पोलिसांना सूचना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर ‘ओएचई’ (ओव्हर हेड इक्विपमेंट) तारेचा विद्युत पुरवठा खंडित करून ट्रॅक्शन विभागाच्या साहाय्याने या गाडीचा पेंटो खाली घेऊन हे इंजिन कोचपासून वेगळे करण्यात आले. हे इंजिन लूपलाईनवर उभे करण्यात आले. त्यानंतर या गाडीला दुसरे इंजिन लावून ती पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. संबंधित युवकाने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.(प्रतिनिधी) मृताची दुचाकी आढळली नरेंद्रनगर पुलावर मृत युवकाची अॅक्टीव्हा गाडी पोलिसांना नरेंद्रनगर पुलाजवळ आढळली आहे. त्यामुळे त्याने नरेंद्रनगर पुलावरून रेल्वेगाडीखाली उडी घेण्याच्या हेतूने उडी मारली. मात्र त्याचा अंदाज चुकला आणि तो २५ हजार केव्ही उच्चदाबाच्या ‘ओएचई’ तारेवर अडकून गंभीर भाजला. त्यानंतर तो स्वर्णजयंती एक्स्प्रेसच्या पेंटोमध्ये अडकला आणि गाडी बंद पडली.
स्वर्णजयंती एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये अडकून युवकाचा मृत्यू
By admin | Published: March 19, 2017 3:02 AM