नागपूर : मेट्रो पिलरला पेंट करणाऱ्या बूम लिफ्ट मशीनखाली दबून एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री संत्रा मार्केट येथील रेल्वे स्टेशनच्या गेटजवळ घडली. या घटनेने या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
प्राप्त माहितीनुसार, रात्री ८.१५ वाजता रेल्वे गेटसमोरील मेट्रो पिलर व छताला बूम लिफ्ट मशीनच्या मदतीने पेंट करण्यात येत होते. ३५ ते ४० वर्षीय मृतक युवक रस्त्याच्या कडेला झोपला होता. चालक मशीन रिव्हर्स घेत होता. यादरम्यात युवक मशीनखाली आला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नागरिक गोळा झाले. त्यांनी नारेबाजी करीत मेट्रो आणि कंत्राटदाराला जबाबदार ठरवित कारवाईची मागणी केली. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला. घटनेनंतर आरोपी चालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी शव मेडिकलला रवाना करून चौकशीस प्रारंभ केला आहे.
मेट्रो रेल्वेने पिलर आणि छताच्या रंगरंगोटीचे काम आयटीडी कंपनीला दिले आहे. आयटीडी कंपनीने मॅन लिफ्ट नामक कंपनीला बूम लिफ्ट मशीन उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यानुसार कंपनीने आयटीडीला तीन मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. आरोपी चालक मॅन लिफ्ट कंपनीचा आहे. सर्व मेट्रो लाइन मुख्य मार्गावर आहेत. या मार्गावर वाहने आणि नागरिकांची ये-जा जास्त असते. बूम लिफ्ट मशीनमुळे रस्ते अरुंद होतात. त्यामुळे अपघात होण्याची जास्त शक्यता असते. रात्री मोठ्या मशीनने पेंट करताना रस्त्यावर सुरक्षा रक्षक तैनात करणे आवश्यक आहे. रात्री पेंटिंग करताना जीवितहानी होऊ नये म्हणून कोणतीही सुरक्षा बाळगण्यात आली नव्हती. गणेशपेठ पोलिसांनी बूम लिफ्ट मशीनचे चालक, कंत्राटदार कंपनी आणि मेट्रो अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करीत आहेत.