आनंद डेकाटे
नागपूर : आधीच संकटात सापडलेला शेतकरी आणि त्यात हाती आलेले पीकही अतिवृष्टीने गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडलेले होते. अशा परिस्थितीत सापडलेल्या शेतकºयाला मायबाप सरकारकडून मदतीची अपेक्षा होतीच. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला खरा; परंतु अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यासाठी मात्र शेतकºयांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नागपुरातील हिवाळी अधिवेशन हे नेहमीच गाजत असते. यंदा अवघ्या सहा दिवसाचे अधिवेशन भरवले गेले. या सहा दिवसात काय होणार हा प्रश्नच होता. झालेही तसेच. या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास ठेवला गेला नाही. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे सभागृहात अभिनंदन करण्यात आले. माजी सदस्य दिवंगत माणिकराव सबाने व अशोक तापकीर यांना शोकसंवेदना व्यक्त करण्यात आली. दुसºया दिवशी विरोधकांनी शेतकºयांना २५ हजार रुपये नुकसान भरपाईचा मुद्दा उचलून धरला. यावर सभागृहात सामना वृत्तपत्राचे बॅनर फडकावल्याने भाजप-शिवसेना सदस्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली. सदस्यांना सक्त समज दिली. पहिले दोन दिवस फारसे कामकाज होऊ शकले नाही. परंतु पुढे तीन दिवस मात्र रात्री उशिरापर्यंत कामकाज चालले. यादरम्यान सात विधेयके मंजूर करण्यात आली. यात महापालिकेत एक सदस्यीय प्रभाग पद्धतीचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच १० रुपयात शिवभोजन थाळी, प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय, पूर्व विदर्भात स्टील प्लँट, धान उत्पादकांना आणखी २०० रुपये अनुदान, यवतमाळ जिल्ह्यातील सिंचनासाठी २५३ कोटी, आदिवासी मुलामुलींना पौष्टिक अन्न देण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाकगृह आदी महत्त्वाच्या घोषणासुद्धा या अधिवेशनात झाल्या.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नवीन आहेत, प्रशासनाचा अनुभव नाही, अशी टीका विरोधकांकडून झाली. परंतु ठाकरे यांनी एकूणच आपल्या कार्यशैलीतून विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. तसेच संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून आपली ओळख निर्माण करण्यातही ते यशस्वी ठरले.संविधान प्रास्ताविकेचे वाचन, ऐतिहासिक सुरुवातमहाराष्ट्राच्या विधिमंडळातील मंजूर केलेली अनेक ऐतिहासिक विधेयके व घालून दिलेल्या परंपरा नंतर संपूर्ण देशाने अवलंबिल्याचा इतिहास आहे. या गौरवशाली इतिहासाच्या परंपरेत यंदा आणखी एक नवीन पायंडा घातला गेला. तो म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनाने अधिवेशनाची सुरुवात. भविष्यात ही परंपरा देशातील इतर विधिमंडळांमध्येही अवलंबिली जाईल, अशी अपेक्षा आहे.सदस्य नवीन पण ‘परफॉर्मन्स बेस्ट’विधानसभेचे ९७ सदस्य पहिल्यांदाच निवडून आलेत. अध्यक्ष नाना पटोले यांनी जास्तीत जास्त नवीन सदस्यांना बोलण्याची संधी दिली. या सदस्यांनीही संधीचे सोने केले. आदित्य ठाकरे, रोहित पवार, आदिती तटकरे, विकास ठाकरे यांच्यासारख्या नवीन सदस्यांनी मोठ्या विश्वासाने सभागृहात आपले मुद्दे मांडले. अनेक नवीन उपयुक्त सूचनाही केल्या. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही त्यांचे कौतुक केले.