लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने दुसऱ्या लाॅकडाऊनची घाेषणा केला आणि अत्यावश्यक सेवा वगळता अन्य उद्याेगधंदे बंद झाले. त्यामुळे सामान्य नागरिकांना राेजगार मिळेनासा झाल्याने अर्थिक अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे. त्यातच मायक्राेफायनान्स कंपन्यांनी याच लाॅकडाऊन काळात कर्जदारांकडे कर्जवसुलीचा तगादा लावला आहे. यात खासगी बॅंका व पतसंस्थांचाही समावेश आहे. त्यामुळे या कर्जाच्या हप्त्यांची परतफेड करण्यासाठी पैसा आणायचा कुठून, या तणावात कर्जदार नागरिक जगत आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांनी बचत गटांच्या माध्यमातून मायक्राेफायनान्स कंपन्या, खासगी बॅंका व पतसंस्थांकडून कर्जाची उचल केली आणि त्या रकमेतून त्यांनी छाेटे उद्याेगधंदे सुरू केले. या उद्याेगधंद्यातून मिळणाऱ्या मिळकतीतून ते आजवर कर्जाच्या व्याजाची परतफेड करायचे. काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने दाेनदा लाॅकडाऊन जाहीर केले. त्यामुळे ग्रामीण भागातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर उद्याेगधंदे व दुकाने बंद ठेवणे भाग पडले. अनेकांची दुकाने व उद्याेगधंदे वर्षभरापासून बंद आहेत. उत्पन्न थांबल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. यातील अनेकांना त्यांच्या कुटुंबीयांचे राेजचे उदरभरण करणेही कठीण झाले आहे.
त्यातच मायक्राेफायनान्स कंपन्या, खासगी बॅंका व पतसंस्थांनी त्यांच्या कर्जदारांकडे कर्जाच्या थकीत व चालू हप्त्यांची व्याजासह वसुली करायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी काही कर्जदारांना नाेटीस बजाविल्या, तर काहींच्या घरी येऊन आणि काहींनी फाेन करून कर्ज मागायला सुरुवात केली. आधीच अडचणी असल्याने कर्ज भरण्यासाठी रक्कम आणायची कुठून? असा प्रश्नही काही कर्जदारांनी उपस्थित केला. ही समस्या गंभीर रूप धारण करीत असल्याने शासनाने यावर काहीतरी ताेडगा काढावा, अशी मागणीही कर्जदार नागरिकांनी केली आहे.
...
चक्रवाढ व्याजाची डाेकेदुखी
अनेकांनी या कर्जाच्या रकमेतून वाहन खरेदी केले तर काहींनी छाेटे उद्याेग सुरू केले. काहींनी घराच्या बांधकामांसाठी कर्ज घेतले. ग्रामीण भागातील नागरिकांना राष्ट्रीयीकृत बॅंका कर्ज द्यायला तयार हाेत नसल्याने अनेकांनी नाईलाजास्तव खासगी बॅंक, पतसंस्था व मायक्राेफायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले. काही मायक्राेफायनान्स कंपन्यांची त्यांचे ग्रामीण भागात चांगले जाळे विणले आहे. काेराेना संक्रमणामुळे बहुतेकांकडे कर्जाचे हप्ते थकीत राहिले आहे. या रकमेवर संबंधितांनी चक्रवाढ व्याज आकारून ते वसूल करायला सुरुवात केली आहे. या प्रकारामुळे आत्महत्या करण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया काही कर्जदारांनी व्यक्त केली आहे.