शेतकरी सन्मान योजना : २०३.४९ कोटींची कर्जमाफी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा लाभ नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २५,२०५ शेतकरी थकबाकीदार सदस्यांना होणार असून त्याद्वारे त्यांची २०३.४९ कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे. जिल्ह्यातील ७६.४४ टक्के शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कृषी कर्जवाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कृषी कर्ज वाटपासाठीही आघाडी घेऊन सर्वाधिक कर्ज उपलब्ध करून दिले आहे. शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शासनाने शेतकऱ्यांना कृषी कर्ज उपलब्ध व्हावे, यादृष्टीने कर्जमाफीची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. त्यानुसार नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेऊन १ एप्रिल २००९ नंतर कृषी कर्जाचे वाटप झालेले आणि ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेल्या शेतकरी सभासदांची संपूर्ण माहिती एकत्र करून त्यांना परत कर्ज उपलब्ध व्हावे, यादृष्टीने पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आहेत. शेतकऱ्यांना सहज व सुलभपणे कर्ज पुरवठा करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या होत्या, त्यानुसार यावर्षी सुमारे पाच हजार शेतकरी सभासदांना सुमारे ३० कोटी रुपयांचे कर्ज वाटप पूर्ण केले आहे. शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्याचे थकबाकीदार कर्जदारांनाही नव्याने कर्ज पुरवठा करणे बँकेला सुलभ झाले आहे. शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळणार योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या सुमारे २२२८७ शेतकरी सभासदांना १३६ कोटी ५९ लाख ८९ हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. त्यांचा सातबारा कोरा होत असल्यामुळे नवीन कर्जही उपलब्ध होणार आहे. यामध्ये सरासरी थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी ८३.७७ टक्के शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच दीड लाखावर थकीत कर्ज असलेल्या २९१८ शेतकऱ्यांना ६६ कोटी ८९ लाख ३३ हजार रुपये कर्जमाफी मिळणार आहे. त्यासाठी शेतकरी सभासदांना दीड लाखावरील थकीत कर्जाची रक्कम भरावी लागणार आहे. योजनेंतर्गत दीड लाखावरील थकीत कर्जदार शेतकरी सभासदांनी उर्वरित रक्कम भरुन कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.
जिल्हा बँकेच्या २५,२०५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
By admin | Published: July 12, 2017 2:50 AM