भिवापूर : शेतात पेरले ते रोगराई, किडीचा प्रादुर्भाव आणि परतीच्या पावसाने गेले. अशाही आर्थिक कोंडीत दोन मुली व मुलाचे लग्न उरकले. कर्जाची परतफेड व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची दारे बंद झाली. यातून आर्थिक व मानसिक कोंडी झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने शेतात गळफास घेत जीवनयात्रा संपविली. तालुक्यातील मानोरा येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास उजेडात आलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
वामन शंकर रंगारी (५१, रा. मानोरा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मानोरा हे गाव उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याने प्रभावित आहे. त्यामुळे गावात व शेतात वन्यप्राण्यांचा कायम धुडगूस असतो. यात उभ्या पिकांचे नुकसान होत असल्याने अनेक शेतकरी रात्रीच्या सुमारास शेतात जागलीकरिता जातात. वामनसुद्धा गुरुवारी रात्रीच्या सुमारास शेतात जागलीकरिता गेला होता. मात्र, सकाळी ११ वाजूनही तो घरी परतला नाही. त्यामुळे मृतकाची वयोवृद्ध आई जेवणाचा डब्बा घेऊन शेतात गेली.
दरम्यान, शेतातील बोरीच्या झाडाला वामनचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळला. माहिती मिळताच ग्रामस्थ व पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर सायंकाळी मृतदेह कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आला. ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र डहाके व गोकुळ सलामे करीत आहेत.
दोन बँकांचे कर्ज
मृत वामनला दोन विवाहित मुली व एक मुलगा आहे. त्याच्याकडे सात एकर शेती आहे. एका राष्ट्रीयीकृत बँकेचे व सेवा सहकारी संस्थेचेसुद्धा कर्ज असल्याची माहिती मृतकाचा मुलगा शुभमने दिली. कर्जाची परतफेड आणि कुटुंबाचा गाडा अशी दुहेरी आर्थिक कोंडी त्याची झाली होती. यातूनच त्याने आत्महत्या केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.