शरद मिरे
लोकमत : खरीप हंगामासाठी शेतकऱ्याने बँकेकडे पीककर्जाची मागणी केली. मागणी मंजूरही झाली. मात्र कर्जाची रक्कम तीन टप्प्यात देणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. त्यानुसार दोन टप्प्याची रक्कम शेतकऱ्याला मिळाली. मात्र तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित रक्कम देण्याचे टाळले. असे असताना शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर संपूर्ण मंजूर कर्जाची नोंद करण्यात आली. एवढेच नव्हे तर कर्जमाफीनंतरसुद्धा उर्वरित रक्कमेचा भरणा करण्यासाठी बँकेने शेतकऱ्याकडे तगादा लावला आहे. हा प्रकार भिवापूर तालुक्यात दोन शेतकऱ्यांशी घडला आहे.
तालुक्यातील रोहना येथील शेतकरी मुकुंदा लकडे यांनी पत्नी कमलच्या नावे आयसीआसीआय बँकेच्या जवळी शाखेतून १९ डिसेंबर २०१७ रोजी पीककर्ज घेतले होते. लकडे यांनी सदर बँकेकडे एक लाख ३२ हजार ५०० रुपये कर्जाची मागणी केली होती. बँकेने तेवढे कर्ज मंजूरही केले. कर्जाची रक्कम तीन टप्प्यात देणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार बँकेने दोन टप्प्यात ८० हजार रुपये दिले. उर्वरित तिसऱ्या टप्प्यातील कर्जाची रक्कम मागणी करूनही शेतकऱ्याला मिळाली नाही. मात्र कर्जदार शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर संपूर्ण मंजूर कर्जाची रक्कम नोंदविण्यात आली. दरम्यान, शासनाने यावर्षी दाेन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली. यात सदर शेतकऱ्याला प्राप्त रक्कम अर्थात ८० हजार रुपये माफ झाले. मात्र सदर बँक व्यवस्थापन शेतकऱ्याला देय न केलेली उर्वरित रक्कम अर्थात ५२ हजार ५०० रुपयाची व्याजासह मागणी करत आहे. कर्जाची जी रक्कम मिळालीच नाही ती रक्कम कशी भरावी, असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. असा प्रकार मेढा येथील शेतकरी गुंडेराव मोहड यांच्याशीसुद्धा झाला आहे. गुंडेराव यांनी २०१७ मध्ये याच शाखेकडे एक लाख ६२ हजार ५०० रुपये कर्जाची मागणी केली होती. बँकेने तेवढ्या रक्कमेचे कर्ज मंजूरही केले. मात्र मोहड यांनासुद्धा बँक व्यवस्थापनाने दोन टप्प्यात केवळ एक लाख रुपये दिले. उर्वरित कर्जाची रक्कम मागणी करूनही देण्यात आली नाही. मोहड यांच्या सातबाऱ्यावर संपूर्ण कर्ज रक्कमेची अर्थात एक लाख ६२ हजार ५०० रुपयाची नोंद करण्यात आली. कर्जमाफीत त्यांनासुद्धा प्राप्त रक्कम एक लाख रुपये शासनाने माफ केले. त्यानंतर बँक मात्र त्यांना उर्वरित ६२ हजार ५०० रुपयाची व्याजासह मागणी करत आहे. बँकेकडून सुरू असलेल्या या प्रकारामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
--
९०० रुपयाची मागणी
कर्जरूपी जी रक्कम मिळालीच नाही, ती आम्ही भरायची कशी, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. तर उत्तर देण्यास सपशेल अपयशी ठरलेले बँक व्यवस्थापन वसुलीसाठी तगादा लावत आहे. बँकेचे कर्मचारी शेतकऱ्याच्या घरी जात त्यांचे दार ठोठावत आहे. कधी ५००, तर कधी ९०० रुपयाची मागणी करत आहे. पैशाची मागणी करणारे हे महाशय कोण आहेत याचा शोध घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात बँक व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.
चौकशीचे आदेश
यासंदर्भात दोन्ही शेतकऱ्यांनी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांची भेट घेत तक्रार केली. कांबळे यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत सहायक निबंधकांना चौकशीच्या सूचना दिल्या आहे. कर्जरूपी मंजूर झालेली मात्र प्राप्त न झालेली रक्कम बँकेने तात्काळ द्यावी. शिवाय दोन लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा संपूर्ण लाभ द्यावा, अशी मागणी दोन्ही शेतकऱ्यांनी केली आहे.