कर्जमाफीचा निर्णय होणार, पण योग्य वेळी : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 08:41 PM2019-12-19T20:41:48+5:302019-12-19T20:43:24+5:30

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शब्द सरकारने दिला आहे. त्यानुसार निर्णय होईलच. पण नक्की कधी हे आपण आज सांगू शकत नाही. मात्र सरकार शेतकऱ्यांप्रती असलेल्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी केले.

Debt waiver will be decided, but at the right time: Ajit Pawar | कर्जमाफीचा निर्णय होणार, पण योग्य वेळी : अजित पवार

कर्जमाफीचा निर्णय होणार, पण योग्य वेळी : अजित पवार

Next
ठळक मुद्देसरकार शेतकऱ्यांबद्दलच्या भूमिकेवर ठाम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शब्द सरकारने दिला आहे. त्यानुसार निर्णय होईलच. पण नक्की कधी हे आपण आज सांगू शकत नाही. मात्र सरकार शेतकऱ्यांप्रती असलेल्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी केले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर शेतकरी कर्जमाफीबद्दल चर्चा सुरू आहे. त्यामुळे निश्चितपणे भूमिका घेतली जाईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना दुसरीकडे राज्याच्या विकासासाठी पैसा कमी पडला जाऊ नये, याचेही नियोजन सरकारला करावे लागणार आहे. त्यामुळे काही अवधी लागणार आहे. कर्जमाफीचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना व्हावा, हा हेतूही कर्जमाफी देताना जोपासला जाणार आहे. फेबु्रवारी महिन्यानंतर होणाऱ्या नवीन अधिवेशनात आढावा घेऊन यासंदर्भात घोषणा केली जाऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या दुष्काळी मदतीचा जाहीर केलेला पुढचा टप्पा लवकर देण्याच्या दृष्टीने वित्तमंत्री जयंत पाटील यांनी तयारी सुरू केली आहे.
विरोधकांच्या कांगाव्याबद्दल ते म्हणाले, सरकार नवीन आहे. आता कुठे कामकाज हाती घेतले आहे. नवीन सरकारला कामकाज करण्यासाठी काही काळ द्यावा लागतो, हे त्यांनी समजून घ्यावे. त्यांना आम्हीही त्यासाठी वेळ दिला होता. विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे सभागृहात दिली जात आहे. त्यामुळे त्यांनी समजून घेण्याची गरज आहे.
नागरिकत्व संशोधन विधेयक सादर झाल्यापासून देशातील वातावरण बदलले आहे. पाच राज्यातील मुख्यमंत्र्यांनी या विधेयकाला विरोध दर्शविला आहे. अनेक मंचावरून आणि अनेक भागांतून या विरोधात मते मांडली जात आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यासंदर्भात दिल्लीमध्ये भूमिका स्पष्ट केली. पक्षाचीही हीच भूमिका असल्याचे ते म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळातील खातेवाटपासंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते मिळून ठरवतील, त्यावर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी निर्णय घेतील. अधिवेशनानंतर खातेवाटपासंदर्भात स्पष्टता होईल.
स्थानिक पातळीवर महाआघाडी
लवकरच पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. ग्रामपंचायतींच्याही निवडणुका आहेत. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आहे. वर्षभरात त्याचा अनुभव कसा राहतो, त्यावरून स्थानिक पातळ्यांवर महाविकास आघाडीच्या प्रयोगाबद्दल दिसेल. मात्र स्थानिक कार्यर्त्यांचीही भूमिका यात महत्त्वाची असल्याने त्याचाही विचार करावा लागेल, असे पवार म्हणाले.

Web Title: Debt waiver will be decided, but at the right time: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.