नागपूर : दुसऱ्याच्या मालकीचे कपड्याचे दुकान आपले आहे, असे सांगून एका आरोपीने बजाज फायनान्स कंपनीमधून सहा लाख, ८० हजारांचे कर्ज लाटले. त्याची ही बनवाबनवी दोन वर्षांनंतर उघड झाली.
गणेश मारोतराव सावरकर (वय ४४, रा. महाल) असे आरोपीचे नाव आहे. त्याने डिसेंबर २०१९ मध्ये बजाज फायनान्सच्या सदर शाखेत व्यावसायिक कर्जासाठी अर्ज केला. आपले अदा स्टाइल नावाने कपड्याचे दुकान असल्याचे बनावट कागदपत्र सावरकरने कंपनीत जमा केले. त्याआधारे ६ लाख, ८० हजारांचे कर्ज उचलले. कर्जाच्या थकीत रकमेची वसुली होत नसल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आरोपीने दिलेल्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली असता ते दुकान दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीचे असल्याचे उघड झाले. त्यामुळे कंपनीतर्फे महेश गणेशराव मोहकार यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी करून आरोपी सावरकरविरुद्ध शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.