नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून अनेक तरुणींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पीडितेनेच रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. भिकन नामदेव माळी (४२ रा. सुभाषनगर, धुळे) असे आरोपीचे नाव आहे.
पीडितेने ऑनलाइन विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली होती. हे पाहून ९ जून रोजी माळीने तिला रिक्वेस्ट पाठविली होती. त्याने स्वतःची ओळख मोहित राजाराव पवार, मुंबई अशी करून दिली व स्वत: अभियंता, तर वडील निवृत्त पोलीस अधिकारी असल्याचा दावा केला. त्याने तिच्याशी लग्न करण्याची तयारीदेखील दाखविली. तिच्या कुटुंबीयांना भेटण्याच्या बहाण्याने माळी १२ जून रोजी नागपुरात आला. त्याने तिला लग्न करण्याचे आश्वासन देत सामाजिक कार्याच्या नावाखाली २० हजार रुपये मागितले. तिने त्याला ते दिले व पुण्याचे त्याचे तिकीटदेखील काढून दिले. भोले पेट्रोल पंपाजवळ असलेल्या ओळखीच्या ट्रॅव्हल ऑफिसमधून तिने तिकीट काढले. पुण्यात परतल्यानंतर माळीने तिच्याशी बोलणे टाळले. तिने पैसे मागितले असता ऑनलाइन पाठवितो असे त्याने सांगितले व मग मोबाईलच बंद केला. तिने तिच्या ओळखीच्या ट्रॅव्हल्स कर्मचाऱ्याला माळी जेव्हाही दिसेल तेव्हा कळवायला सांगितले.
३ ऑक्टोबर रोजी ओळखीच्या व्यक्तीने पीडितेला फोन केला व माळीने ४ ऑक्टोबर रोजी दुपारचे मुंबईचे तिकीट काढल्याचे सांगितले. त्यानंतर तिने माळीला पकडण्याची योजना बनविली. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी माळी एका तरुणीला घेऊन ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात आला. पीडितेने त्याला थांबवले आणि फसवणुकीबाबत जाब विचारला. दरम्यान, गर्दी जमली. माळीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. लोकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. दरम्यान, त्याच्यासोबत आलेली तरुणी तेथून निघून गेली. लोकांनी माळीला सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले. महिलेच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून माळीला अटक केली. माळीचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा आणि एक मुलगीदेखील आहे. त्याच्या अशा कृत्यांमुळे कुटुंबही निघून गेले आहे.
२५ हून अधिक मुलींची फसवणूक?
प्राथमिक तपासात माळीने २५ हून अधिक तरुणींची फसवणूक केल्याचा संशय आहे. त्याचे २० ते २५ बनावट आयडी आहेत. यामध्ये स्वत:ला अधिकारी किंवा अभियंता बनवून लग्न करू इच्छिणाऱ्या मुलींना तो फसवत होता. लग्नाच्या दबावामुळे मुली त्याला पैसे देतात. फसवणूक झाल्यास मुली बदनामीच्या भीतीने तक्रार नोंदवत नाही.