लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन हस्तांतर प्रकरणात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी विधानसभेत निवेदन करत सद्सद् विवेकबुद्धीला स्मरून हा निर्णय घेतल्याचे सांगितले. आपण कोणतेही नियमबाह्य काम केले नसून न्यायालय जी शिक्षा देईल ती भोगायला तयार असल्याचेही ते म्हणाले. वाशिम जिल्ह्यातील घोडबाभूळ गावातील ३७ एकर १९ गुंठे जमीन बेकायदा खासगी व्यक्तीला दिल्याप्रकरणी सत्तार यांच्यावर दीडशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. नागपूर खंडपीठाने याबाबत ताशेरे ओढल्याने सोमवारी विरोधकांनी गोंधळ घालत विधानसभेचे कामकाज बंद पाडले होते. त्यातच सिल्लोड महोत्सवासाठी १५ कोटी रुपयांच्या वसुलीचे ‘कॉल रेकॉर्डिंग’ व्हायरल झाले होते. त्यावरूनही विरोधक आक्रमक झाले होते. मात्र, मंगळवार आणि बुधवारी या मुद्द्यावर विरोधकांनी नरमले होते.
टीईटी घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिल्यानंतर विरोधकांनी निषेध करत सभात्याग केला. ही संधी साधत सत्तार यांनी जमीन घोटाळा प्रकरणाचा खुलासा केला. दिवाणी न्यायालयाचा निकाल अधिकाऱ्यांनी माझ्या निदर्शनास आणला नाही. वारसा नोंदी आणि जमीन कसत असल्याचे पुरावे माझ्यासमोर आल्यामुळे मी हा निर्णय घेतला, असे सत्तार म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"