लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : मागील बैठकीत १८ ते २५ एप्रिल दरम्यान वैद्यकीय सेवा वगळता अन्य दुकाने कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय किराणा व्यापारी, कृषिसेवा केंद्र संचालक, भाजीपाला विक्रेते यांच्या पुढाकारातून घेण्यात आला होता. आता उद्या सोमवारपासून काय होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.
रविवारी (दि. २५) या विषयावर सभेचे आयोजन केले गेले. पुन्हा पाच दिवस व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार राजू पारवे, नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया यांनी केले. यावर व्यापाऱ्यांनी संमती दिल्यानंतर ३० एप्रिलपर्यंत कडकडीत बंदच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
उमरेड पालिकेच्या स्व. रणधीरसिंह भदोरिया सभागृहात आयोजित सभेत कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती रूपचंद कडू, तहसीलदार प्रमोद कदम, मुख्याधिकारी सुवर्णा दखणे, डॉ. अजितसिंग खंडाते, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांची मंचावर उपस्थिती होती. येत्या पाच दिवसांत घरपोच किराणा साहित्य पोहचविण्याची आणि शहरात ठिकठिकाणी हातगाडीवर भाजीपाला विक्रीची मुभा देण्यात आली. व्यापाऱ्यांच्या पुढाकारातून बंदचा निर्णय झाल्यानंतर या आठवड्यात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीतसुद्धा कमालीची घट दिसून आली, अशी माहिती तहसीलदार प्रमोद कदम यांनी दिली. नगरसेवक सतीश चौधरी, सुरेश चिचमलकर, जयसिंह गेडाम, विशाल देशमुख, हरिहर लांडे, दामोदर मुंधडा, अनिल गोविंदानी, उमेश वाघमारे, संजय मुंडले, पंकज फटिंग, दिलीप चव्हाण, अनिल येवले, वैभव भिसे, राहुल मने, मनीष शिंगणे आदींनीही आपआपली मते यावेळी व्यक्त केली.
केवळ किराणा व्यापाऱ्यांमुळेच कोरोना पसरत आहे का, असा सवाल उपस्थित करीत मधल्या कालखंडात लग्न समारंभांसाठी उसळलेल्या गर्दीवर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नव्हते. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली नाही. तेव्हा आपल्या अपयशाचे खापर आमच्यावर फोडू नका, अशा स्पष्ट शब्दांत अनिल गोविंदानी यांनी भूमिका मांडली. प्रशासनाने केवळ बंदचा निर्णय घेऊन कोरोनावर नियंत्रण ठेवता येणार नाही, तर आरोग्य यंत्रणासुद्धा अधिक सक्षम कराव्या लागतील, असेही विचार यावेळी व्यक्त झाले. दुकानासमोर उभे राहून व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. नियमावलीचा भंग केल्यास थेट गुन्हा दाखल केला जाईल, यावरही लक्ष केंद्रित केले गेले.
....
‘त्या’ नियमावर आश्चर्य
शासनाच्या नवीन नियमावलीनुसार, किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवता येतील. ही वेळ केवळ पुणे, मुंबईसाठीच योग्य आहे. अन्य भागात ही वेळ योग्य नाही. शासनाच्या या नियमावर आश्चर्य व्यक्त करीत वेळेत बदल करण्याची मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली. सकाळी १० ते दुपारी २ अशी वेळ निश्चित करावी, असे विचार यावेळी व्यापाऱ्यांनी मांडले.
....
टाकीत दूषित पाणी
उमरेड कोविड सेंटरमधील पाण्याच्या टाकीचा वापर सुमारे वर्षभरापासून झालेला नाही. यामुळे टाकीत गाळ साचला असून, पाणी दूषित असल्याच्या गंभीर बाबीकडे उमेश वाघमारे यांनी लक्ष वेधले. आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालास होत असलेला विलंब ही समस्यासुद्धा यावेळी मांडण्यात आली.