नागपूर : एकूण १५१ सदस्य संख्या असलेल्या नागपूर महापालिकेत आपला एकमेव नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापनादिनी महापालिकेत येत्या काळात सत्ता स्थापन करण्याचा निर्धार केला आहे. शहरात पक्षाची वाढलेली ताकद व कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर हे साध्य करून दाखवू, असा दावाही नेत्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त गणेश पेठ येथील कार्यालयात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री रमेश बंग, अल्पसंख्याक राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही, नवनियुक्त शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, गंगाप्रसाद ग्वालबन्सी, सलिल देशमुख, माजी आ. दीनानाथ पडोळे, विजय घोडमारे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर, दिलीप पनकुले, बजरंग सिंह परिहार, वर्षा शामकुले, आभा पांडे, धनराज फुसे, प्रेम झाडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी नागपूर महापालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून राष्ट्रवादीची सत्ता कशी आणता येईल, याबाबत निर्धार व्यक्त करण्यात आला. येत्या काळात सर्वांना सोबत घेऊन, मानसन्मान देऊन पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा मानस दुनेश्वर पेठे यांनी व्यक्त केला. शब्बिर विद्रोही यांनी सूत्रसंचालन केले, तर महेंद्र भांगे यांनी आभार मानले.